Manjiri Pupala: फिल्म जगतात वर्षाला शेकडो चित्रपट तयार होतात. पण, अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना मिळणारे मानधन हे कमी असते. नायकाला नेहमीच जास्त महत्त्व दिले जाते. आजच्या काळात नायिकांचे महत्व वाढले असले तरी त्यांचे मानधन वाढलेले नाही. आजही अनेक अभिनेत्री नायकांच्या तुलनेत कमी फी मिळाल्याने नाराजी व्यक्त करतात. फक्त मानधनचं नाही तर महिला कलाकारांना इतरही अडचणींचा सामना करावा लागतो. नुकतंच अभिनेत्री मंजिरी पुपाला हिने सिनेसृष्टीतील महिलांच्या विदारक परिस्थितीवर भाष्य केलं. यासोबत तिने दरवेळी अभिनेत्यांना अभिनेत्रीपेक्षा जास्त मानधन का? असा प्रश्नही उपस्थित केला.
मंजिरी पुपाला हिने नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तिनं विविध विषयांवर भाष्य केलं. मुलाखतमध्ये तिला अनेकदा अभिनेत्यांना जास्त आणि अभिनेत्री कमी असं मानधन मिळत. त्यावर काय वाटतं. तुला असा अनुभव आला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तरात ती म्हणाली, "इंडस्ट्रीमध्ये पैसे न देणे असे तर खूप प्रकार होतात. हे फक्त महिला नाही तर सर्वांसोबतचं होतं. महिलांना कमी पैसे देणे तर हे फार काळापासून सुरू आहे. हे आता बदललं पाहिजे. महिलांना जास्त पैसे द्या, असं मी म्हणत नाहीये. पण, महिलांनाही समान पैसे मिळाले पाहिजेत".
ती म्हणाली, "भेदभाव हा सगळ्या स्तरांमध्ये आहे. हे फक्त ज्युनिअर कलाकारासोबत होतं, ए लिस्टर कलाकासासोबत होत नाही, असं बिलकूल नाही. हे सर्वांसोबत होतं. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एका अभिनेत्याच्या खांद्यावर संपुर्ण चित्रपट उभा केला जातो. त्यामुळे त्याला प्रोजेक्टचे जास्त पैसे दिले जातात. पण, आता 'डब्बा कार्टेल' सीरिज आली आहे. जिचं खूप कौतुक होतं आहे. त्यात सर्व महिला कलाकारांनी काम केलं आहे. महिला कलाकारांच्या खांद्यावर उभा राहिलेल्या सीरिजमध्ये जर एका पुरुषाला जास्त पैसे दिले तर हे चुकीचं असेल".
इंडस्ट्रीतील महिलांच्या समस्या मांडताना ती म्हणाली, "शुटिंगमध्ये अभिनेत्रींना दिल्या जाणाऱ्या व्हॅनिटी छोट्या असतात. बायकांकडे भरजरी कपडे असतात. साड्या असतात. त्याला जास्त जागा लागते. पण, पुरुष कलाकार असेल तर त्याचं टॉयलेट मोठं असतं. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जेव्हा आम्ही शूटला जातो, तेव्हा मेकअप-हेअर डिपार्टमेंटमधील मुली आम्हाला विनंती करुन व्हॅनिटीमधील वॉशरूम वापरतात. कारण जे स्टाफसाठीचं जे वॉशरूम आहे, ते अत्यंत वाईट अवस्थेत असतं. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या मुलींना दिले जाणारे वॉशरुम स्वच्छ आहेत का, याचा विचार केला जात नाही. या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे".