गेले आठ महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे तोंड देणारे, गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारे अत्यंत प्रामाणिक नेते मनोहर पर्रीकर यांचे आज काल निधन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल रात्री आठ वाजता त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. वयाच्या ६३ व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंगद्वारे पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता संजय दत्तने ट्विटरवर लिहिले आहे की, देशातील सर्वात्कृष्ट नेत्याच्या निधनाबाबत नुकतेच कळले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. माझ्या प्रार्थना आणि संवेदना त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत आहेत.
तर लता मंगेशकर लिहितात, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाविषयी ऐकून मला खूपच वाईट वाटले. त्यांचे आणि आमचे खूपच चांगले स्नेहसंबंध होते. त्यांच्या जाण्याने आपल्या देशाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एक चांगला माणूस, नेता देशाने गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन लिहितात, मृदू स्वभावाचे मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूपच वाईट वाटले. त्यांना भेटण्याची मला अनेक वेळा संधी मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर भेटल्यानंतर नेहमीच एक स्मितहास्य असायचे.
अभिनेता रणदीप हुड्डाने लिहिले आहे की, फार कमी बोलणारे, अतिशय शांत आणि साध्या स्वभावाचे, स्ट्रेट शूटर, सरंक्षण मंत्री आणि गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेले, सत्याच्या हव्यासापासून कायम दूर असलेले, आयआयटीमध्ये शिकलेले, देशावर नित्सिम प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आज आपण गमावले. त्यांच्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. सर, तुम्हाला सलाम
अभिनेता सुबोध भावे लिहितो, गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री, एक अतिशय सुसंस्कृत, समंजस आणि अभ्यासू नेता मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.