मनोज वाजपेयीचे लग्न अभिनेत्री नेहासोबत झाले असून तिने होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात काम केले आहे. एप्रिल २००६ मध्ये मनोज आणि नेहाने लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि ती संसारात रमली. लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा आणि मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते.
पण तुम्हाला माहीत आहे का, मनोज वाजपेयीचे हे दुसरे लग्न आहे. मनोजचे पहिले लग्न त्याने इंडस्ट्रीत एंट्री करण्याच्याआधीच झाले होते. पण लग्नाच्या दोनच महिन्यात त्यांनी वेगळे व्हायचे ठरवले.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मनोजने त्याच्या स्ट्रगलिंग दिवसांमध्ये दिल्लीमधील एका मुलीसोबत लग्न केले होते. पण लग्नानंतर केवळ दोन महिन्यानंतर ते वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मनोज त्याकाळात बॉलिवूडमध्ये येण्यासाठी स्ट्रगल करत होता. याच कारणामुळे त्याचा घटस्फोट झाला असे म्हटले जाते.
१९९८ मध्ये प्रदर्शित राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ने मनोज वाजपेयी या नावाला नवी ओळख दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्याआधी एक काळ असाही होता, जेव्हा लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. एका मुलाखतीत खुद्द मनोजने ही खंत बोलून दाखवली होती. त्याने सांगितले होते की, ‘तो एक काळ होता, जेव्हा मीडिया मला जराही भाव द्यायचा नाही. मी कुठल्याही पार्टीला गेलो आणि मीडियाचे कॅमेरे चुकून माझ्याकडे वळले तरी लगेच ते दुसऱ्या बाजूला वळवले जायचे.’
‘सत्या’च्या यशानंतरही काही काळ मनोजकडे खूपच कमी चित्रपट होते. पण प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ या चित्रपटाने पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली. मनोज वाजपेयीने वयाची पन्नासी पूर्ण केली असून चित्रपटसृष्टीत त्याला २५ वर्षे पूर्ण झाले आहेत.