Join us

मी सुद्धा आत्महत्या करणार होतो...! मनोज वाजपेयीने केला मोठा खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 10:19 AM

वाचा, मनोज वाजपेयीची स्ट्रगल स्टोरी

ठळक मुद्देमला आजही आठवते, एका एका सहाय्यक दिग्दर्शकाने  माझा फोटो फाडून फेकून दिला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचे अनेक कलाकार डिप्रेशनवर बोलत आहेत. अनेक सेलिब्रिटी त्यांचा स्ट्रगल काळ, डिप्रेशन याबद्दलची माहिती शेअर करत आहेत. बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी त्यापैकीच एक.  एका ताज्या मुलाखतीत तो बोलला. स्ट्रगलच्या काळात माझ्याही मनात आत्महत्येचाही विचार आला, पण त्यावेळी त्याच्या मित्रांनी फार साथ दिली, असा  खुलासा मनोज वाजपेयीने यावेळी केला.ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयीने स्ट्रगल काळातील अनेक गोष्टी शेअर केल्यात.

मी एक शेतक-याचा मुलगा. पण मला अभिनेता बनायचे होते. झोपडीत राहणा-या माझ्यासारख्या मुलाला अमिताभ बच्चनसारखे बनायचे होते.  तेव्हा माझी ऐपत नव्हती. पण स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर वयाच्या १७ व्या वर्षी मी दिल्ली युनिव्हर्सिटीत दाखल झालो. तिथे मी नाटकात काम केले. मला अभिनेता व्हायचेय, हे घरच्यांना माहित नव्हते. हिंमत करून एकेदिवशी वडिलांना पत्र लिहून सगळे सांगितले. ते रागावतील, असे मला वाटले. पण ते रागावले नाही उलट त्यांनी माझी फी भरण्यासाठी २०० रुपये पाठवले. मी कोणत्याच कामाच्या लायकीचा नाही असे गावातले लोक म्हणायचे. पण त्याकडे मी दुर्लक्ष केले. अभिनयाच्या वेडाने झपाटल्याने मी एनएसडीमध्ये (नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा) प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला. पण तीन वेळा माझा अर्ज नाकारला गेला. मी आत्महत्या करणार होतो. मी खचलो होतो. आत्महत्येचा विचार सारखा मनात येत होता. माझ्या मित्रांना याची कल्पना होती. मी आत्महत्या करेन की काय या भीतीने त्या दिवसांत माझे मित्र माझ्या बाजूलाच झोपायचे. ते मला क्षणाभरही कधीच एकटं सोडत नव्हते. माझा प्रवेश होईपर्यंत त्यांनी माझी साथ दिली. 

त्यावर्षी मी एका चहावाल्याच्या दुकानात चहा पित बसलो होता. अचानक   तिग्मांशू धूलिया त्याच्या खटारा स्कूटरवर मला शोधत आला. शेखर कपूरने मला ‘बँडिट क्वीन’मध्ये भूमिकेची ऑफर दिली असल्याचे त्याने मला सांगितले. मी तयार झालो आणि तसाच मुंबईला आलो.  पण मुंबईत राहणे कठीण होते. पाच मित्रांसोबत मी एका चाळीत राहायचो, असे मनोज यावेळी सांगितले.  

मला हाकलून लावले...मला आजही आठवते, एका एका सहाय्यक दिग्दर्शकाने  माझा फोटो फाडून फेकून दिला होता. एका दिवसात मी तीन प्रोजेक्ट गमावले होते.  पहिल्या शॉटनंतर इथून चालता हो, असे सांगून अक्षरश: मला सेटवरून हाकलून लावले गेले होते. माझा चेहरा हिरोसारखा नव्हता.  त्यामुळे मोठ्या पडद्यावर मी काम करूच शकत नाही, असे त्यांना वाटायचे. कधी साधा वडापाव खाण्यासाठी पैसे नसायचे, मग घराचे भाडे कसे देणार. मात्र माझ्या पोटातली भूक माझ्या यशाच्या भूकेला मारू शकत नव्हती. अखेर मला महेश भट्ट यांच्या टीव्ही सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी एका एपिसोडसाठी दीड हजार रुपये मिळायचे.  त्यानंतर मला ‘सत्या’ची आॅफर मिळाली, असे मनोजने सांगितले.

टॅग्स :मनोज वाजपेयी