Join us  

'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 10:46 AM

१४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आज हयात नसला तरी त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून तो आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. १४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचा मृत्यू प्रकरणावरुन मोठा गदारोळ उडाला. पण आजही त्याच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.  सुशांत अनेक बॉलिवूड कलाकारांच्या जवळ होता. त्यापैकी एक म्हणजे मनोज वाजपेयी. सुशांतचे मनोज वाजपेयी यांच्याशी चांगले संबंध होते. नुकतेच मनोज यांनी एका मुलाखतीमध्ये सुशांत मृत्यू प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. 

मनोज यांचा 'भैय्या जी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. अलिकडेच त्यांनी सिद्धार्थ कानन यांच्याशी संवाद साधला. यावेळी मनोज यांनी सुशांतला ब्लाइंड आर्टिकलचा खूप त्रास व्हायचा, असा खुलासा केला.  सुशांतने आत्महत्या करण्याच्या 10 दिवस आधी मनोज वाजपेयी यांच्याशी संवाद साधला होता आणि आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. 

सुशांतने ब्लाइंड आर्टिकलवर मनोज वाजपेयी यांच्याशी चर्चा केली होती आणि या गोष्टींचा कसा सामना करायचा हेही विचारल्याचं अभिनेत्यानं सांगितलं. मुलाखतीमध्ये मनोज वाजपेयी म्हणाले,  'सुशांतला कोणतेही तथ्य नसलेल्या ब्लाइंड आर्टिकलचा खूप त्रास होत होता. तो खूप चांगला माणूस होता आणि जो चांगला असेल त्याला अशा लेखांमुळे त्रास होईलच.  तो अनेकदा याबाबत मला विचारायचा. तेव्हा त्याला मी फक्त या सगळ्याचा जास्त विचार करू नको असाच सल्ला द्यायचो. तसेच मी या गोष्टींचा कसा सामना करतो हीदेखील मी त्याला सांगितलं होत'.

पुढे मनोज म्हणाले, 'आमची चर्चा झाली आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यूने मला मोठा धक्का बसला होता. दोन माणसे गेली आहेत,  यावर आजपर्यंत माझा विश्वास बसत नाही. यात एक सुशांत आणि दुसरी व्यक्ती इरफान खान आहे. ते लवकर निघून गेले. सुशांत आणि इरफान यांचं एक युग आलं असतं असा माझा विश्वास होता'.

मनोज बाजपेयीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर  लवकरच ते 'भैय्या जी' चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला, ज्यामध्ये अभिनेता दमदार ॲक्शन मोडमध्ये दिसून आले. यामध्ये मनोज यांच्या अभिनयाचं लोकांनी कौतुक केलं. ट्रेलरमध्ये मनोज यांची रॉबिनहूड स्टाईल दिसली. हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :मनोज वाजपेयीसिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटीसुशांत सिंग रजपूत