बॉलिवूडमधील प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee). 'सत्या', 'गँग्स ऑफ वासेपूर' अशा सिनेमांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप पाडली. मोठा पडदाच नाही तर 'द फॅमिली मॅन' सीरिजमधून त्याने ओटीटी माध्यमही गाजवलं. काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयीने शेअर केलेला एक फोटो पाहून चाहते चकित झाले होते. मनोजने त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला होता ज्यामध्ये त्याचे चक्क 8 पॅक अॅब्स दिसत होते. या फोटोमागचं सत्य आता त्याने उघड केलं आहे.
मनोज वाजपेयीची 'किलर सूप' सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. यामध्ये त्याने कोंकणा सेन शर्मासोबत स्क्रीन शेअर केली. सीरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या सीरिजमुळे चर्चेत असलेल्या मनोज वाजपेयीने सोशल मीडियावर अचानक शर्टलेस फोटो शेअर केला. यामध्ये त्याचे 8 पॅक अॅब्स स्पष्ट दिसत होते. अनेकांना हा फोटो मॉर्फ्ड आहे असंच वाटलं. तर अनेकजण फोटो पाहून चकितच झाले. त्याने हे अॅब्स बनवले कधी, हा चमत्कार कसा झाला असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता मनोज वाजपेयीने स्वत:च यामागचं सत्य सांगितलं आहे.
एका मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाला,'तो फोटो मॉर्फ्ड होता. तो नेटफ्लिक्सच्या कँपेन स्ट्रॅटेजीचा भाग होता. त्यांना हाय लेवलवर हे कँपेन सुरु करायचे होते आणि मी त्यात यशस्वी झालो. ते जाणूनबुजूनच करण्यात आले होते.'
मनोज वाजपेयीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला तो फोटो शेअर केला होता. 'नवीन वर्ष नवा मी...चविष्ट सूपचा माझ्या शरिरावर झालेला परिणाम बघा. एकदम किलर लूक आहे ना.' हा फोटो 'किलर सूप'च्या प्रमोशनचा भाग होता हे आता समोर आले आहे. 11 जानेवारी रोजी ही सीरिज प्रदर्शित झाली. मर्डर मिस्ट्रीला कॉमेडीचा तडका सीरिजमध्ये आहे. अभिषेक चौबेने सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.