अभिनेता मनोज वाजपेयीची (Manoj Bajpayee) वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. मोठा पडदा असो किंवा ओटीटी माध्यम मनोज वाजपेयीच्या अभिनयाची जादू सगळीकडेच पसरली आहे. फॅमिली मॅन सिरीजमुळे मनोजला आणखी लोकप्रियता मिळाली. मनोज खऱ्या आयुष्यातही फॅमिली मॅन आहे. अभिनेत्री शबाना रजासोबत (Shabana Raza) लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आश्चर्य म्हणजे दोघांच्याही घरच्यांनी विरोध केला नाही. हिंदू घरातील मनोजने पत्नी शबानाच्या धर्माबाबत नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज केवळ एक उत्तम अभिनेता नसून चांगला माणूसही आहे.त्याला नाती निभावणं माहित आहे. मनोज पत्नी शबानासह धर्मावर चर्चा करत नाही. तो म्हणाला, 'जसं मला हिंदू असण्याचा अभिमान आहे तसंच माझ्या पत्नीला मुस्लिम असण्याचा अभिमान आहे. मात्र धर्मापेक्षा जास्त आम्ही दोघे महत्वाचे आहोत. आम्ही दोघंही एकमेकांच्या मूल्यांचा आदर करतो.'
आपल्या सुखी संसाराचं गुपित सांगताना मनोज म्हणाला,'माझं शबानासोबत लग्न हे कोणत्याही धर्मापेक्षा मोठं आहे. धर्माबद्दल आम्ही बोलत नाही. उद्या जर दोघांपैकी एकानेही स्वत:ची मूल्ये बदलली तर लग्न टिकणार नाही. आमच्यात कधीच धर्मावरुन भांडणं होत नाहीत. तिच्या धर्माविरोधात केलेली कोणतीही टिप्पणी मी सहन करणार नाही. जो असं करतो त्याच्याशी मी नातंच तोडतो हे माझ्या आजुबाजुच्या लोकांना माहित आहे. भले ते माझ्या मागे पत्नीच्या धर्माबदद्ल बोलतात पण माझ्या तोंडावर बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही. कारण त्यांना माहित आहे की अशा प्रकारे बोललात तर मी खूप कठोर वागतो.'
मनोज वाजपेयीचा नुकताच 'गुलमोहर' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. या सिनेमात त्यांनी शर्मिला टागोर यांच्या मुलाची भूमिका केली आहे. तर लवकरच त्याची 'फॅमिली मॅन 3' ही सिरीज येत आहे ज्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.