मनोज वाजपेयीनं (Manoj Bajpayee ) काल परवा एक व्हिडीओ शेअर केला आणि ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचे चाहत्यांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला. ‘द फॅमिली मॅन ३’ (The Family Man3) येणार म्हणून सगळेच क्रेझी झालेत. पण मनोज वाजपेयीनं गंडवलं ना राव...! होय, मुळात मनोज वाजपेयीने ज्या ‘फॅमिली’ची गोष्ट केली, ती भलतीच निघाली. होय, 'फैमिली के साथ आ रहा हूं, स्वागत नहीं करोगे हमारा?' असं कॅप्शन देत मनोज वाजपेयीने एक व्हिडीओ शेअर केला होता.
“बरेच दिवस झाले तुम्हाला भेटून, आता माझं म्हणणं नीट एका. या होळीच्या निमित्ताने मी येतोय तुमच्या फॅमिलीला भेटायला माझ्या फॅमिलीला घेऊन, भेटूया लवकरच,”असं तो व्हिडीओत म्हणताना दिसला. मनोज वाजपेयी ‘फॅमिली’बद्दल बोलतोय म्हणजे ‘द फॅमिली मॅन ३’ येतेय, असाच सगळ्यांनी अंदाज बांधला. मग काय, ‘द फॅमिली मॅन’च्या चाहत्यांनी सोशल मीडियावर जणू दिवाळी साजरी केली. पण आता खरा खुलासा झालाये. मनोज वाजपेयी ‘द फॅमिली मॅन ३’बद्दल नाही तर त्याच्या ‘गुलमोहर’ या त्याच्या आगामी सिनेमाबद्दल बोलत होता. तो ज्या ‘फॅमिली’ची गोष्ट करत होता, ती ‘गुलमोहर’ची ‘फॅमिली’ होती.
मनोज वाजपेयीचा ‘गुलमोहर’ नावाचा नवा सिनेमा येतोय. येत्या ३ मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाचं पोस्टरही मनोज वाजपेयीने शेअर केलं आहे. यात शर्मिला टागोर, कावेरी सेठ, सिमरन, सूरज शर्मा, उत्सवी झा असे सगळे कलाकार दिसत आहेत.
चाहते नाराज, म्हणाले...मनोज वाजपेयी ‘द फॅमिली मॅन ३’बद्दल नसून गुलमोहरबद्दल बोलत होता, हे स्पष्ट झाल्यावर अनेक चाहते नाराज झालेत. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. ही अपेक्षा नव्हती...मला वाटलं ‘द फॅमिली मॅन ३’ येतेय, असं एका चाहत्याने लिहिलं.
इतना बडा धोखा, असं लिहित एका चाहत्याने आपली नाराजी व्यक्त केली. सर, फॅमिली हा शब्द ऐकून आमचा उत्साह शिगेला पोहोचला होता...‘द फॅमिली मॅन ३’ची डेट आली असं समजून आम्ही आनंदात होताे, पण तुम्ही आम्हाला गंडवलं.., अशी प्रतिक्रया एका चाहत्याने दिली.
प्राइम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून मनोज बाजपेयीने ओटीटी विश्वात पदार्पण केलं. लोकांनी ही सीरिज अक्षरशः डोक्यावर घेतली. मध्यंतरी या वेबसीरिजचा दूसरा सीझनसुद्धा प्रदर्शित झाला अन् त्यालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या वेबसीरिजमधील त्याने साकारलेलं श्रीकांत तिवारी हे पात्र लोकांना खूप भावलं.