'सोन चिरैया' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्य भारतातील डाकूंवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित या चित्रपटात मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये सुशांत डाकूच्या भूमिकेत दिसत असून मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा आपल्या दमदार डायलॉगने प्रत्येक चाहत्यांची मने जिंकली आहेत.
मनोज वाजपेयीची झलक पाहिल्यानंतर असा कयास लावला जात आहे की, तो डाकू मान सिंगची भूमिका साकारत आहे. डाकू मान सिंह हा आग्रामधील कुप्रसिद्ध डकैती होता. त्याच्यावर हत्या करण्याचे 185, तर लुटमार करण्याचे 1,112 गुन्हे दाखल होते. मात्र, गरिबांमध्ये त्याची छवि रॉबिन हुडप्रमाणे होती. सर्वसामान्य आणि गरीब लोकांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्याने खुनी खेळ खेळला. मात्र, कोणत्याही असहाय माणसावर अन्याय केला नाही.
“उडता पंजाब’ आणि “इश्किया’ यासारख्या चित्रपटातून दर्शकांचे मनोरंजन केलेले दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी “सोन चिरैया’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, भूमि पेडनेकर, मनोज वाजपेयी, रणवीर शोरे आणि आशुतोष राणा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘सोन चिरैया’मध्ये १९७० च्या दशकातील कथा पाहायला मिळणार आहे.
त्याकाळात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे.