Join us

Birthday Special : ‘या’ व्यक्तिच्या परवानगीनंतरच मनोज कुमार यांनी साईन केला होता पहिला चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 9:08 AM

 भारत कुमार या नावाने ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीचं. आज (२४ जुलै) मनोज कुमार यांचा वाढदिवस. 

 भारत कुमार या नावाने ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीचं. आज (२४ जुलै) मनोज कुमार यांचा वाढदिवस. आपल्या अभिननयाने त्यांनी एक काळ असा काही गाजवला की, आजही ते अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. २४ जुलै १९३७  रोजी हरियाणातील करनाल येथे त्यांचा जन्म झाला. तुम्हाला ठाऊक असेलचं की, त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे आहे. त्यांच्या जन्मावेळी करनाल पाकिस्तानात होते. फाळणीनंतर ते भारतात आले होते. 

दिल्ली विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अचानक त्यांना अभिनयक्षेत्र खुणावू लागले. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबाबत एक रोचक कहाणी आहे. मनोज कुमार यांनी त्यांची मंगेतर शशी हिला विचारून चित्रपट साईन केला होता. होय, लीड अ‍ॅक्टर म्हणून एका चित्रपटाचा प्रस्ताव मनोज कुमार यांच्याकडे आला आणि मी माझ्या मंगेतरला विचारून सांगतो, म्हणून त्यांनी काही वेळ मागून घेतला. यानंतर मनोज कुमार यांनी खरोखर शशीसोबत चर्चा केली आणि तिच्या होकारानंतर कुठे या चित्रपटाला होकार दिला. यापश्चात मनोज कुमार यांनी शशीसोबत लग्नही केले. 

 

मनोज कुमार यांचे मनोज हे नाव कसे पडले, यामागेही किस्सा आहे. मनोज लहान होते, तेव्हा आपल्या मामासोबत चित्रपट पाहायला गेले होते. तो चित्रपट होता ‘शबनम’ आणि यात दिलीप कुमार लीड रोलमध्ये होते/ या चित्रपटात त्यांनी मनोज नावाचे पात्र साकारले होते. दिलीप कुमार यांचा अभिनय पाहून मनोज इतके प्रभावित झालेत की, मी अभिनेता बनलो तर मनोज कुमार हेच नाव ठेवणार, हे त्यांनी ठरवून टाकले होते.हरियाली और रास्ता, वो कौन थी, हिमालय की गोद में, दो बदन, उपकार, पत्थर के सनम, नील कमल, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, क्रांती हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

अभिनयाबरोबर मनोज कुमार यांनी देशभक्तिपर सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘भारत कुमार’ आणि ‘क्रांती कुमार’ ही नावं दिली.   १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केले होते. देशभक्तिवर आधारित सिनेमे तयार करणा-या मनोज कुमार यांच्याकडे तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ या घोषवाक्यावर एक सिनेमा तयार करण्याचा आग्रह धरला होता.

 

टॅग्स :मनोज कुमार