ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) रिलीज होताच ट्रोलिंगचा आणि प्रेक्षकांच्या संतापाचा सामना करावा लागला होता. त्याला कारणही तसे होते. 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की' असे शब्द जे आजच्या काळात वापरले जातात ते डायलॉग सिनेमात चक्क रामभक्त हनुमानाच्या तोंडी वापरले गेले आहेत. हे सीन पाहून सर्व संतापले होते. त्यानंतर ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान आता त्यांनी हात जोडून माफी मागितली आहे.
मनोज मुंतशीर यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये लिहिले की, 'आदिपुरुष' चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, एक आणि अटूट राहण्याची आणि आपल्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!'
युजर्स म्हणाले...मनोज मुंतशीर यांनी माफी मागितताच हे ट्विट व्हायरल झाले. त्यांच्या या ट्विटवर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, 'संवाद लिहिण्यापूर्वी विचार करायला हवा होता.' दुसऱ्याने लिहिले, 'तुम्ही संधी साधू आहात.' तर काहींनी 'तुम्ही आमच्या माफीला पात्र नाही' अशी प्रतिक्रिया दिली.
मनोज मुंतशीर या स्टेटमेंटमुळे झाले होते ट्रोल
याआधी मनोज मुंतशीर यांनी हनुमानजी हे देव नसून ते रामभक्त असल्याचे सांगून ट्रोल झाले होते. आम्ही त्याला देव बनवले. यानंतर ते लोकांच्या निशाण्यावर आले होते. नंतर त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना संरक्षणही मिळाले होते.