अवघ्या काही तासांवर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे त्या ऐतिहासिक दिवसाची प्रत्येक भारतीय आतुरतेने वाट पाहत आहे. अयोध्येसह संपूर्ण देशात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्याचा भाग होण्यासाठी अयोध्येमध्ये पोहोचले आहेत.तर, सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. यामध्येच लेखक, पटकथा लेखक मनोज मुंतशीर (Manoj muntashir) यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
अलिकडेच मनोज मुंतशीर यांनी 'आजतक'च्या 'साहित्य तक' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांना रामाचं मंदिर होईल असं वाटलं होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी हे सगळं स्वप्नवत वाटत असल्याचं म्हटलं.
नेमकं काय म्हणाले मनोज मुंतशीर?
"खरं तर राम मंदिर बांधून होईल असं मला वाटलंच नव्हतं. पण, आज राम मंदिर बांधून तयार आहे. रामलल्ला त्यामध्ये विराजमान होणार आहेत. हे सगळं माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणेच आहे. त्यामुळे हे स्वप्न संपूच नये असं सतत वाटतंय. काही तासांमध्ये रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे," असं मनोज मुंतशीर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "आपण काय राम मंदिर मक्का किंवा मदिनामध्ये उभारण्याची मागणी करत होतो? नाही ना, मग त्यांनी वाद न घालता प्रेमाने आपल्याला अयोध्या दिली पाहिजे होती. आपण भारतात राहतो आणि आपल्याला हे सिद्ध करावं लागतं की, रामाचा जन्म अयोध्येत झाला होता ही बाब फारच दुर्दैवी आहे. १९८५ ते २०१९ या काळामध्ये कायदेशीर लढाई सुरु होती ही माझ्यासाठी फार वेदनादायक गोष्ट आहे. ज्यावेळी आपण आपल्या मंदिराची मागणी केली तर लगेच आपण असहिष्णू झालो."
दरम्यान, "५०० वर्ष हिंदूंना आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागला. विशेष म्हणजे कुठेही रक्तपात न वाहता त्यांनी लढा दिला. हिंदू किती सहिष्णू आहेत हे मी कसं सांगू? जर जागतिक शांततेचं नोबेल कुणाला द्यायचं असेल तर कोणा एकाला नाही. समस्त १०० कोटी भारतीयांना मिळालं पाहिजे. राम मंदिराचं आंदोलन शांततेत झालं," असंही मनोज म्हणाले.