फिल्मफेअर अवार्ड सोहळा नेहमीप्रमाणे यादगार ठरला. पण यावर्षी या काही वेगळ्या कारणांसाठीही या सोहळ्याची चर्चा झाली. एक कारण म्हणजे, गीतकार मनोज मुंतशीर यांनी घेतलेला निर्णय. होय, फिल्मफेअर अवार्ड न मिळाल्याने दुखावलेले गीतकार मनोज मुंतशीर यांनी अवार्ड शोला कायमचे अलविदा केले आहे. यानंतर आपण कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला हजर राहणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली.तर आता हे प्रकरण काय,हे जरा जाणून घेऊ. तर प्रकरण आहे, उपेक्षेचे. 2019 मध्ये अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा रिलीज झाला. प्रेक्षकांना हा सिनेमा जितका आवडला, तितकीच या चित्रपटाची गाणीही आवडली. चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में घुल जावां’ हे गाणे best track of the yearमध्ये आले. या गाण्याला फिल्मफेअर अवार्ड मिळेल, असा विश्वास मनोज मुंतशीर यांना होता. त्यांनीच हे गाणे लिहिले होते. पण फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही आणि मनोज मुंतशीर दुखावले. इतके की, सोशल मीडियावर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
‘यापुढे मी कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला हजर राहणार नाही. अशा सोहळ्यांवर बहिष्कार टाकणार. कदाचित संपूर्ण आयुष्य प्रयत्न केलेत तरी मी ‘तेरी मिट्टी’ सारखे शब्द पुन्हा लिहू शकणार नाही. या गाण्याने लाखो भारतीयांचे डोळे पाणावले. पण तुम्ही (फिल्मफेअर अवार्ड) यांनी या गाण्याच्या शब्दांचा सन्मान करण्यात असमर्थ ठरले. यामुळे मी तुम्हाला अलविदा म्हणतो. यापुढे अखेरच्या श्वासापर्यंत कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला मी जाणार नाही. अलविदा..., ’ असे ट्वीट त्यांनी केले.
फिल्मफेअर अवार्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार ‘गली बॉय’ या चित्रपटातील ‘अपना टाईम आएगा’ या गाण्यासाठी डिव्हाइन व अंकुर तिवारी यांना मिळाला.