गत 30 डिसेंबरला भोजपुरी सुपरस्टार व खासदार मनोज तिवारी यांनी कन्यारत्न झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. एक बरीच मोठी मुलगी असताना मनोज यांना इतक्या वर्षांनंतर दुसरी मुलगी झालेले पाहून अनेकांना आश्चर्यही वाटले होते. यानंतर खुद्द मनोज तिवारी यांच्या दुस-या लग्नाचा खुलासा केला होता. लॉकडाऊन काळात मनोज यांनी सुरभीसोबत दुसरे लग्न केले. याच दुस-या पत्नीपासून मनोज यांना दुसरी मुलगी झाली. आता मनोज यांनी आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे.
दुसरी मुलगी होताच चाहत्यांनी त्यांना या मुलीचे ‘रिंकिया’ असे नामकरण करण्याचे सुचवले होते. याचे कारण होते मनोज तिवारी यांचे ‘रिंकिया के पापा’ हे लोकप्रिय गाणे. मात्र मनोज यांनी मोठ्या मुलीच्या म्हणजेच रितीच्या (पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी) म्हणण्यानुसार आपल्या मुलीचे नाव ठेवले.
त्यांनी सांगितले की, माझ्या मोठ्या मुलीने लहान मुलीचे नाव सुचवले. मुलगी झाली तर तिचे नाव सान्विका ठेवणार, असे तिने आम्हाला आधीच सांगितले होते. त्यामुळे आम्ही छोट्या बेबीचे सान्विका असे नामकरण केले. सान्विका हे लक्ष्मीचे नाव आहे. योगायोग म्हणजे रिती हे सुद्धा दुर्गेचे नाव आहे. त्यामुळे आता माझ्या घरात दोन देवी आहेत.पहिल्या पत्नीला दिलेल्या घटस्फोटानंतर 8 वर्षांनी गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच एप्रिल 2020 मध्ये मनोज तिवारींनी सुरभी तिवारीशी लग्न केले. सुरभी मनोज यांची सेक्रेटरी होती आणि ती एक चांगली गायिकाही आहे.
2004 मध्ये मनोज तिवारी यांनी ‘ससुरा बड़ा पइसावाला’ हा भोजपुरी सिनेमा केला. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेत. सिनेमात येण्यापूर्वीच म्हणजे 1999 मध्ये त्यांनी राणी तिवारीसोबत लग्न केले होते. मनोज यांनी 13 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. मनोज आता 50 वर्षांचे आहेत.