Join us

‘मंटो’ यांचे कार्य काळाच्या पुढचे-नंदिता दास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 7:08 PM

नंदिता दास या अभिनेत्री म्हणून तर उत्कृष्ट आहेतच पण, दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृ ती साकारल्या. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘फिराक’. गंभीर विषयांना त्यांनी मोठया पडद्यावर न्याय मिळवून दिला.

तेहसीन खान

नंदिता दास या अभिनेत्री म्हणून तर उत्कृष्ट आहेतच पण, दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृ ती साकारल्या. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘फिराक’. गंभीर विषयांना त्यांनी मोठया पडद्यावर न्याय मिळवून दिला. ‘फिराक’ नंतर त्यांनी ‘मंटो’चे काम हाती घेतले. मंटो यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या एकमेव उद्देशाने त्यांनी चित्रपट काढायचे ठरवले. अन् मग तिच्या चित्रपट प्रवासाला सुरूवात झाली. तिच्या ‘मंटो’च्या प्रवासाविषयी आणि एकंदरितच कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या या गप्पा... 

* ‘फिराक’ नंतर तुम्ही कुठे होता? ‘मंटो’च्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर आम्ही तुम्हाला भेटणार ? काय कारण?- २००८ ते २०१८ या दरम्यान मी खूप व्यस्त होते. ‘फिराक’ नंतर मला मुलगा झाला अन् मग मी ८ वर्ष मी त्यातच व्यस्त झाले. आई असणं हा एक फुल टाइम जॉब आहे. २०१२ मध्ये मी ‘मंटो’वर काम करायला सुरूवात केली. यादरम्यान मी ‘बिटविन द लाइन्स’हे नाटक लिहिले आणि दिग्दर्शितही केले.  तसेच विद्यापीठात नंतर एक कोर्सही केला. तर तुम्ही असं म्हणू शकता की, मी कोणत्या ना कोणत्या गोष्टीत नक्कीच बिझी होते. ‘मंटो’ मुळे एवढी बिझी होते की, मला दुसरं काही सुचायचंच नाही. 

* तुम्हाला ‘मंटो’मधील कोणती गोष्ट प्रभावित करते? मंटोचे दिग्दर्शन करणं तुम्ही कसं ठरवलंस? - ‘मंटो’ हा अत्यंत कठीण चित्रपट आहे. मी मंटोंबद्दल कॉलेजमध्ये असताना साहित्य वाचले होते. २०१२ मध्ये मी त्यांना जाणून घ्यायला सुरूवात केली. तेव्हा मला जाणीव झाली की, त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या जीवनातील कहानी पण खूप उत्सुकता वाढवणाऱ्या  आहेत. काळाच्या पुढील त्यांचे लिखाण आहे. सध्या आपण ज्या मुद्यांना घेऊन चर्चा करतो त्या मुद्यांवर त्यांनी तेव्हाच काम सुरू केले होते. लिंगभेद, जात, धर्म, ओळख या मुद्यांवर काम करणारा तो खरा माणूस होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवता या दोन्ही मुद्यांवर त्यांनी लेखन केले आहे.

* मंटो आणि तुमचे वडील जतीन दास यांच्यात काय साम्य आहे?- एका कलाकारासाठी स्वातंत्र्य किती महत्त्वाचे असते हे आजही समजते. मंटोची कहानी आजच्या काळात सादर करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. माझे वडील जतीन दासही त्यांच्याप्रमाणेच आहेत. दोघेही स्वतंत्र विचारांचे होते. मंटो हा चित्रपट त्या सर्व कलाकारांसाठी आहे जे स्वतंत्र विचारांचे आहेत.

* इरफान खान यांना तुम्हाला मंटो म्हणून घ्यायचे होते का?- मी नवाजपासूनच सुरूवात केली होती. पण, मी जेव्हा लिहायला सुरूवात केली तेव्हा मला दोघेही जण खूपच उत्कृष्ट कलाकार वाटले. पण, नवाज यांच्या डोळयात मंटो यांच्यासारखीच ‘बात’ आहे. त्याच्या डोळयात एक अशी शक्ती आहे की, ज्या डोळयांनी अख्खे जग पाहिले आहे. मंटोने खूप तरूण वयात या जगाचा निरोप घेतला. तेव्हा त्यांचे वय केवळ ४२ होते. मला नवाज मध्ये ते सर्व दिसत होतं जे मंटो मध्ये होतं.

 * तुम्ही चित्रपटासाठी उत्कृष्ट कलाकारांची फौज कशी उभी केली?- दिव्या दत्ता, ऋषी कपूर, गुरदास मान, परेश रावळ, पूरब कोहली, रणवीर शौरी, नीरज काबी, चंदन सन्याल, जावेद अख्तर यासारखे अनेक गुणी कलाकार मी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आणले. मी आणि हनी त्रेहान एकदा असंच चर्चा करत होतो की, कलाकार कोणकोण घ्यायचे. आजच्या काळातील एक लेखक असला पाहिजे म्हणून मी जावेद अख्तर यांच्याशी बोलायचे ठरवले. पण, त्यांनी कधीही कुणासोबत काम केले नव्हते. मात्र, मी त्यांना विनंती करून या चित्रपटात काम करण्याबद्दल विचारले तर ते तयार झाले. 

* चित्रपटातील कलाकारांनी एकही पैसा स्विकारला नसल्याचं आम्हाला कळतंय. खरंय का ते?- होय, खरं आहे ते. नवाजसोबतच कोणत्याच कलाकाराने माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही. त्यामुळे मी खुप खुश आहे या प्रोजेक्टवर काम केल्यामुळे. माझ्यासोबतच सर्व कलाकारांची यामागे मेहनत आहे.

टॅग्स :नंदिता दासनवाझुद्दीन सिद्दीकी