'दंगल'फेम दिग्दर्शक लवकरच 'रामायण' (Ramayan) कथा मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहेत. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) तयारीही सुरु केली आहे. सध्या शरीरयष्टीवर मेहनत घेतोय तर तिरंदाजीही शिकत आहे. सिनेमाचं कास्टिंग अद्याप सुरुच आहे. रोज नवीन अपडेट येत आहे. श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, कौसल्या, कैकयी, मंदोदरी, रावण अशा अनेक भूमिकांसाठी कास्टिंग ठरलेली असतानाच आता यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्याचीही एन्ट्री झाली आहे. हा मराठी अभिनेता श्रीरामाचा भाऊ भरतची भूमिका साकारणार आहे.
'रामायण'सिनेमाबद्दल रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. रणबीर कपूर-प्रभू श्रीराम, साई पल्लवी-सीतामाता, यश-रावण, सनी देओल-हनुमान, लक्ष्मण-रवी दुबे, कैकयी-लारा दत्ता, कौसल्या-इंदिरा कृष्णन, अरुण गोविल-दशरथ, साक्षी तन्वर-मंदोदरी अशा स्टारकास्ट आतापर्यंत समोर आली आहे. रामायणात राम-भरत या भावांची झालेली भेट महत्वाची होती. याच भेटीत भरत आपल्या दोन्ही भावांना आणि सीतामातेला परत घरी येण्याची विनंती करतो. मात्र श्रीराम वचनबद्ध असल्याने स्पष्ट नकार देतात. तेव्हा भरत श्रीरामाच्या पादुका घेऊन जातो आणि त्या सिंहासनावर ठेवून मग राज्य करतो.'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, या महत्वाच्या भूमिकेसाठी मेकर्सने मराठी अभिनेत्याची निवड केली आहे. तो अभिनेता आहे आदिनाथ कोठारे (Adinath Kothare).
रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' मालिकेतही मराठी अभिनेत्यानेच भरत ही भूमिका साकारली होती. अभिनेते संजय जोग हे भरताच्या भूमिकेत होते. तर आता बॉलिवूडचा आगामी महत्वाकांक्षी सिनेमा 'रामायण' मध्ये देखील भरताच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्याला पसंती देण्यात आली आहे. आदिनाथ कोठारेच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे सिनेमात राम-भरतची जी ऐतिहासिक भेट होते त्यात रणबीर कपूरसोबत आदिनाथ कोठारे झळकणार आहे.
आदिनाथने याआधी रणवीर सिंहच्या '83' मध्ये भूमिका साकारली होती. आता त्याला 'रामायण' सारखा आणखी एक बिग बजेट हिंदी सिनेमा मिळाला आहे. यात त्याची भूमिकाही महत्वाची आहे.