"देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था; महापराक्रमी, परम प्रतापी, एक ही शंभू राजा था!" आगामी हिंदी सिनेमा 'छावा' (Chhava)चा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित सिनेमातविकी कौशल (Vicky Kaushal) शंभूराजांच्या भूमिकेत दिसत आहे. विकी कौशलने भूमिका अक्षरश: जगल्याचं ट्रेलरमधूनच दिसून येतं तर संपूर्ण सिनेमा काय असे याची उत्सुकता सर्वांनाच आहे. १४ फेब्रुवारी रोजी सिनेमा रिलीज होत आहे. दरम्यान सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) आहे. त्याची भूमिका नेमकी काय आहे, एकंदर अनुभव काय या निमित्ताने संतोष जुवेकरने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला.
छत्रपती संभाजी महाराजांवर इतक्या मोठ्या स्केलवर सिनेमा येत आहे. तू देखील सिनेमाचा भाग आहेस. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
'छावा' सिनेमात मी रायाजी मालगे ही भूमिका साकारत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी १२७ लढाई लढल्या आणि एकही हरले नाहीत. या लढायांमध्ये त्यांच्यासोबत ८ योद्ध्यांची मुख्य टीम होती. ज्यामध्ये मालोजी, संताजी, धनाजी, येसाजी, रायाजी, हंबीरराव असे पराक्रमी होते. रायाजी हा संभाजी महारांजा दूधभाऊ असंही म्हटलं जातं. छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडमधील Most Evil Warrior अशी रायाजीची ओळख. त्यांची भूमिका मला साकारायला मिळाली हे माझं भाग्यच आहे.
ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली आणि ऑफर येताच तुझा पहिली प्रतिक्रिया काय होती?
खरंतर मला आधी वेगळ्याच भूमिकेसाठी विचारलं गेलं होतं. कास्टिंग डायरेक्टरनेच मला फोन करुन गणोजी शिर्के ही भूमिका ऑफर केली होती. नंतर लक्ष्मण सरांनी मला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं. मला गणोजींची भूमिका ऑफर झालीये हे त्यांना माहितच नव्हतं. मी जेव्हा त्यांना याबद्दल सांगितलं तेव्हा ते म्हणाले, 'अरे, मला तू रायाचींच्या भूमिकेत हवा आहेस. तू त्या रोलसाठी अगदी परफेक्ट आहेस'. मी आधीच छावा कादंबरी वाचली होती. त्यामुळे गणोजींपेक्षा रायाजी साकारायला मिळणं हे माझ्यासाठी आनंदाचंच होतं. कलाकार म्हणून जास्त वेळ सिनेमात दिसणं हे कोणाला नाही आवडणार? त्यामुळे मी रायाजी साकारण्यास लगेच होकार दिला.
या भूमिकेसाठी तुला काय काय प्रशिक्षण घ्यावं लागलं?
छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या गटात सगळेच पराक्रमी, वीर योद्धेच होते. त्यामुळे फक्त विकीचीच नाही तर प्रत्येक कलाकाराची भूमिका महत्वाची आहे. मी याआधी कधीच घोडेस्वारी शिकलो नव्हतो ते यानिमित्ताने शिकलो. साधंसुधं नाही तर अगदी घोडदौड करणं इंग्रजीत galloping असं म्हणतात तेही शिकलो. आता मी महिन्यातून २-३ वेळा पुण्यात घोडेस्वारी करतो. शिवाय तलवारबाजी, दांडपट्टा, भाल्याचं प्रशिक्षण असा सगळाच कमाल अनुभव घेतला.
विकी कौशलसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? तो खऱ्या आयुष्यात नक्की कसा आहे
अरे, त्याला तर मी अगदी 'डार्लिंग'व्यक्तीच म्हणेन. बरेच कलाकार स्टार म्हणून मिरवतात. पण विकी फक्त स्टार नाही तर अभिनयाचा स्टार आहे. प्रचंड जिद्द, मेहनतीने तो स्टार बनला आहे. सिनेमासाठी दोन महिने आम्ही सोबतच प्रशिक्षण घेतलं. त्याचं पॅशन बघून मी चकीतच झालो. मध्यमवर्गीय कुटुंबातून तो इतका पुढे आला आहे. त्यामुळे ये तो अपना बंदा है! असंच त्याला बघून वाटतं. सेटवर तो आमच्यासोबतच जेवायलाही बसायचाय. तुम्ही मुळात माणूस म्हणून चांगले असाल तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हालच. विकी तसाच आहे. तो आज ज्या ठिकाणी पोहोचला आहे त्यासाठी तो खरोखर पात्र आहे.
एवढ्या मोठ्या सिनेमात काम करण्याची संधी तुला मिळाली. चाहत्यांचा कसा प्रतिसाद आहे?
खूपच छान प्रतिसाद मिळाला. जेव्हा सर्वांना समजलं की मी 'छावा'सिनेमात काम करतोय तेव्हा सगळेच खूश झाले. मुळात छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या कोणत्याही संहितेत काम करायला मिळणं हे भाग्याचं आहे. यापुढेही अशा संहितेत मला कधी कोणतीही भूमिका मिळाली तरी मी करेनच. तसंच मला वाटतं अशा भूमिका कलाकार निवडत नाही तर ती भूमिकाच तुम्हाला निवडते. माझ्या राजाच्या सिनेमाचा मी एक भाग आहे यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो.
सिनेमा हिंदी भाषेत आहे. मराठीत का नाही असाही प्रश्न येतोय. त्याबद्दल काय सांगशील?
मराठीतही सिनेमे बनले आहेत. पण हा हिंदी भाषा डोळ्यासमोर ठेवून केलेला सिनेमा आहे. कारण सिनेमा करायचा म्हटलं की बजेट खूप महत्वाचं असतं. ती भव्यता, तो Aura उभं करण्यासाठी पैसा लागतोच. तसंच कितीही बजेट असलं तरी सिनेमा करण्याकरिता तेवढी क्षमता असलेला, अभ्यासु, हुशार असा दिग्दर्शकही हवा. तशी माणसंही लागतात. मराठीत तसे लेखक दिग्दर्शक आहेत पण बजेट नाही. मराठी सिनेमा ग्लोबल नाही याची खंत वाटतेच. छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीत सिनेमा केल्यामुळे तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो असंही मला वाटतं.