बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने हटके भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटची ती धाकड या चित्रपटात पाहायला मिळाली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर आता तिचा आगामी चित्रपट 'इमरजन्सी' (Emergency) लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची फर्स्ट लूक समोर आला आहे. 'इमरजेंसी'चा टीझर रिलीज झाला असून त्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
कंगना राणौतने इमरजन्सीचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, 'Presenting ‘Her’who was called ‘Sir’. यात कंगना डायलॉग म्हणताना दिसते आहे की, 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा की माझ्या कार्यालयात मला सर्वजण मॅडम नाही, सर म्हणून हाक मारतात.' त्यानंतर आणीबाणी जाहीर झाल्याचे सांगणारी एक बातमी वाचल्याचा आवाज ऐकू येतो. आणीबाणीच्या काळातील एकंदरीत परिस्थिती चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
इमरजन्सी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती अभिनेत्री कंगना रणौतने केली आहे. स्क्रीन प्ले आणि संवाद लेखन रितेश शाह यांचे आहे. हा टीझर शेअर करताना अभिनेत्रीने चित्रपटाशी निगडीत कलाकारांना टॅग केले आहे. ज्यामध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा देखील समावेश आहे. त्यामुळे तो देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. पण त्याची भूमिका काय असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अनुपम खेर देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.