२०१५ साली प्रदर्शित झालेला अजय देवगणचा 'दृश्यम' सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिस धुमाकूळ घालण्याबरोबरच प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. 'दृश्यम'ला मिळालेला प्रतिसाद पाहून या सिनेमाचा सीक्वल 'दृश्यम २' २०२२मध्ये प्रदर्शित करण्यात आला. 'दृश्यम २'मध्ये अनेक मराठी कलाकार झळकले होते. यामध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 'दृश्यम २'मध्ये त्याने एका ड्रग्ज डिलरची भूमिका साकारली होती. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सिद्धार्थने 'दृश्यम २'बद्दल भाष्य केलं.
'दृश्यम २' सिनेमासाठी निवड कशी झाली? आणि या सिनेमात काम करण्याचा अनुभव त्याने सांगितला. याबरोबरच दृश्यमचा पहिला भाग बघितलाच नसल्याचा खुलासाही त्याने केला. तो म्हणाला, "मी दृश्यम सिनेमा पाहिलाच नव्हता. लॉकडाऊमधील गोष्ट आहे. तेव्हा तितीक्षा, मी आणि खुशबू एकत्र बसलो होतो. तितीक्षाने विचारलं की दृश्यम बघायचा का? तेव्हा मी तिला म्हणालो की मी सिनेमा पाहिलाच नाहीये. तेव्हा मी पहिल्यांदा सिनेमा पाहिला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच आठवड्यात मला 'दृश्यम २'साठी फोन आला. माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं."
'दृश्यम २' मधील वेगळ्याच भूमिकेसाठी सिद्धार्थने ऑडिशन दिली होती. पण, त्याचा अभिनय आवडल्याने दिग्दर्शकांनी त्याला दुसरा रोल ऑफर केला. याचा अनुभव सांगताना तो म्हणाला, "पण, मी वेगळ्याच भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. 'दृश्यम'मधील कुटुंबाच्या बाजूला राहणाऱ्या जोडप्यातील अंडरकॉप एजेंटच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशन आवडल्याने त्यांनी दुसऱ्या भूमिकेसाठी ऑडिशन घेतलं आणि ती भूमिका मला मिळाली. जेव्हा आपल्याला ऑडिशनमधून निवडलं जातं. तेव्हा आपला आत्मविश्वास आणखी वाढतो. त्यांनी आपलं काम बघून आपल्याला काम दिलं आहे, हे आपल्याला माहित असतं. मला स्क्रिप्ट मिळाली नव्हती. मला फक्त माझे सीन्स माहीत होते. पण, जेव्हा सेटवर गेलो तेव्हा कळलं की हा सिनेमासाठी महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे मी उत्सुक असतो".
'तू अशी जवळी राहा' या मालिकेतून सिद्धार्थ घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तो 'गुम है किसी के प्यार मे' या हिंदी मालिकेत झळकला होता. 'दृश्यम २'नंतर आता सिद्धार्थ 'JNU' या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.