विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या 'छावा' सिनेमात अनेक लोकप्रिय बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत. या कलाकारांसोबत मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीही भूमिका साकारणार आहे. सुव्रत 'छावा'मध्ये नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान सुव्रतने 'छावा' सिनेमात विकी कौशल आणि इतर कलाकारांसोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केला.
सुव्रत म्हणाला की, "छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य जगभरात माहिती व्हायला हवं. आणि दुर्दैवाने त्यांचा इतिहास हा लोकांना फारसा माहीत नाही. त्यांच्या कार्याची महती प्रेक्षकांना समजावी म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांनी यावर चित्रपट करायचा ठरवला. मी या चित्रपटाचा एक भाग आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त आनंद देणारी आहे. महाराजांच्या काळातल्या ऐतिहासिक चित्रपटात मला काम करण्याची इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे."
सुव्रत पुढे म्हणाला की, "लक्ष्मण सरांसारखा दिग्दर्शक आणि त्यांची काम करण्याची पद्धत कमालीची आहे. हिंदी-मराठीत त्यांनी आजवर जे काम केलं ते उत्कृष्ट आहे. त्यांच्यासोबत काम करून अनेक गोष्टी शिकता आल्या. विकी कौशल हा कमालीचा अभिनेता आहे. सेटवर प्रचंड मेहनत करून त्याने ही भूमिका साकारली. या चित्रपटात त्याच्या सोबतीने काम तर केलं पण अभिनेता म्हणून अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकलो."
सुव्रत शेवटी सांगतो की, "चित्रपट करताना प्रत्येक सीन करण्यासाठी आम्ही सगळेच रिहर्सल करायचो आणि प्रत्येक कलाकार त्याच्या सह कलाकारच्या सीनसाठी क्यू द्यायला उभा राहायचा. मेकअप, कॉस्ट्यूम, आर्ट सगळ्या टीमने अहो रात्र मेहनत करून हा चित्रपट तयार केला आहे. रायगडचा सेट एकदा मांडला होता तेव्हा सेटवर ऐतिहासिक वेशभूषेत सर्व कलाकार होते. त्यावेळी असं वाटलं की, आपण खरोखर हा सगळा काळ जगतोय अन् अनुभवतोय. उन्हातान्हाची, कपडेपटाची पर्वा न करता चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने खूप उत्तम काम केलं. त्यामुळे फक्त भारतात नाही तर जगभरात हा चित्रपट पोहोचावा ही माझी इच्छा आहे"