मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित Cannes Film Festival मध्ये छाया कदम यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. नाकात नथ, हटके साडी असा लूक करत त्यांनी आपली संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवली. नुकतंच छाया यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा (Tabu) एक किस्सा सांगितला.
कान्स वरुन परतल्यानंतर छाया कदम यांनी लोकमत फिल्मीशी संवाद साधला. यावेळी तब्बूचा एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, "मी आणि तब्बूने एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हा आमचं सेटवर फारसं बोलणं व्हायचं नाही. नंतर जेव्हा तिने स्क्रीनिंगवेळी सिनेमा पाहिला तेव्हा मी मालवणला गावी होते. तिथए घरात रेंज नसते. मी गावातल्या एका मुलाबरोबर बाईकवरुन फेरफटका मारायला गेले. तेव्हा मला मध्येच मोबाईलला नेटवर्क मिळालं आणि एक फोन आला. मी फोन उचलल्यावर समोरुन ती म्हणाली, 'हॅलो छायाजी, मै तब्बू बात कर रही हूँ'. तेव्हा मला वाटलं की कोणी कास्टिंग डायरेक्टर वगरे असेल म्हणून मी म्हणलं हा बोलो. तेव्हा ती म्हणाली, तु्म्ही खूप कमाल काम केलं. मग मी भानावर आले. आधी गाडी थांबवली आणि तिच्याशी शांततेत बोलले."
ती म्हणाली, 'छायाजी खूपच सुरेख काम केलंत तुम्ही. माझ्या सगळ्या मित्रांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तेव्हा मला वाटलं की बापरे खरं तर तिने फोन करायची अशी काही गरज नव्हती. पण तिने एवढं आपुलकीने फोन करुन सांगितलं. जेव्हा असं कौतुक होतं तेव्हा कलाकाराची ताकद वाढते."
छाया कदम यांनी 'फँड्री', 'सैराट','न्यूड' या मराठी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. तर नुकतंच त्यांच्या 'मडगाव एक्सप्रेस' आणि 'लापता लेडीज' या हिंदी सिनेमातील भूमिका गाजल्या. कान्समध्ये त्यांच्या All we imagine as light सिनेमाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला.