Join us

“दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा...”, गिरीजा ओकने सांगितला ‘जवान’चा अनुभव, म्हणाली, “मी दोन वर्ष...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:17 IST

Jawan Movie : गिरीजाने ‘जवान’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली असून किंग खानबरोबर स्क्रीनही शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ‘जवान’च्या शूटिंगचा किस्सा सांगितला.

गेल्या कित्येक दिवसापासून चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो ‘जवान’ चित्रपट अखेर आज(७ सप्टेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकची झलक दिसल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले. गिरीजाने ‘जवान’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली असून किंग खानबरोबर स्क्रीनही शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ‘जवान’च्या शूटिंगचा किस्सा सांगितला.

गिरीजाने सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तिने जाहिरातींबद्दल भाष्य केलं. याबरोबरच जवानचा अनुभव आणि शूटिंगचे किस्सेही तिने सांगितले. ती म्हणाली, “मी गेली दोन वर्ष या चित्रपटाचं शूटिंग करतेय. आत्तापर्यंत कधीच न साकारलेली भूमिका मी यात साकारत आहे. ट्रेलरमध्ये माझी झलक पाहून तुम्हाला याचा अंदाज आलाच असेल. अक्शन करताना मी यात दिसते आहे. हा माझ्यासाठी थ्रिलिंग अनुभव होता. याआधी कधीच न केलेलं सगळं मी या चित्रपटात केलं आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे.”

“मी या चित्रपटात अनेक अक्शन सीक्वेन्स केले आहेत. मोठमोठे दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शित केलेल्या अटली कुमारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मी त्याचे अनेक चित्रपट बघितले आहेत. या चित्रपटाची ऑडिशन मी एका वेगळ्या भूमिकेसाठी दिलेली आणि नंतर मला वेगळीच भूमिका मिळाली. मी जेव्हा दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा मुळातच या गोष्टीचा आनंद होत होता की ज्याचं आपण काम पाहिलंय त्याच्या चित्रपटात काम करायला मिळणार आहे,” असंही पुढे गिरीजाने सांगितलं.

‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे. तर गिरीजा ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानगिरिजा ओकजवान चित्रपटबॉलिवूड