Join us

'आधी अभ्यास करा आणि मग टीका'; NCB ला ट्रोल करणाऱ्यांना क्रांतीचं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 3:34 PM

Kranti redkar : एनसीबी बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत असल्याचे आरोप काही जणांकडून करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देशनिवारी एनसीबीने मुंबईतील समुद्रात कॉर्डेलिया क्रुझवरील छापा टाकला.

केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) शनिवारी रात्री कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. एनसीबीने टाकलेल्या छाप्यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानचा समावेश असल्यामुळे हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे. विशेष म्हणजे आर्यन खानला ड्रग्स पार्टीप्रकरणी अटक झाल्यानंतर एनसीबी जाणूनबुजून बॉलिवूड सेलिब्रिटींनी लक्ष्य करत असल्याची टीका काही जणांकडून करण्यात येत आहे. याच टीकाकारांना अभिनेत्री आणि समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने सडेतोड उत्तर दिलं आहे. सोबतच एनसीबी करत असलेल्या कामाचं कौतुक करणाऱ्यांचे तिने आभार मानले आहेत.

"तुम्ही करत असलेल्या पाठिंब्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. खरं तर आभार मानण्यासाठी शब्द पुरेस नाहीत. खासकरुन एनसीबीचे प्रयत्न, सतत छापेमारी आणि निर्भीडपणे ते करत असलेली मेहनत तुम्ही ओळखल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने ज्यावेळी बॉलिवूडचा संबंध येतो त्याचवेळी लोक बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या कामाचं वेळोवेळी माध्यमांकडून रिपोर्टिंग होत आहे", असं क्रांती म्हणाली.

Aryan Khan Arrest News: अक्षय कुमारचा मुलगादेखील होता क्रुझ ड्रग्स पार्टीत?

पुढे ती म्हणते, "दोषींना पकडण्याचं त्यांचं काम सुद्धा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि, अशाचप्रकारे तुमचं प्रेम, पाठिंबा कायम पाठीशी राहिली हीच आशा व्यक्त करते.  सध्या एनसीबी मुद्दाम बॉलिवूडला लक्ष्य करतीये, असे आरोप समाजातील काही जण करत आहेत. पण, त्या सगळ्यांना एक विनंती आहे. प्लीज आधी आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यानंतर टीका करा. ते दररोज नव्या संघर्षांना सामोरे जात असतात. आणि, आपण घरी सुरक्षित बसून आपल्या फॅन्सी फोनमधून टीका टाइप करत असतो. नि:स्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागुयात."

दरम्यान, शनिवारी एनसीबीने मुंबईतील समुद्रात कॉर्डेलिया क्रुझवरील छापा टाकला. यावेळी या क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये आर्यन खानदेखील सहभागी होता. सध्या आर्यन एनसीबीच्या ताब्यात असून त्याच्यासह अन्य ८ जणांना अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीक्रांती रेडकरसेलिब्रिटी