विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. दोन आठवड्यात 'छावा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छावा' सिनेमातील कलाकरांचा हळूहळू उलगडा होतोय. विशेष गोष्ट म्हणजे 'छावा' सिनेमात हिंदीसोबत मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत. अभिनेता संतोष जुवेकर 'छावा' सिनेमात दिसणार हे एव्हाना आपल्या सर्वांना कळलं आहेच. आता 'छावा'मध्ये आणखी एक ज्येष्ठ मराठी अभिनेत्री झळकणार याचाही उलगडा झालाय. कोण आहेत त्या?
'छावा'मध्ये दिसणार या ज्येष्ठ अभिनेत्री
'छावा' सिनेमातील 'जाने तू' या गाण्याचा टीझर भेटीला आलाय. या गाण्यात संभाजी महाराजांना ओवाळायला महाराणी येसूबाई पुढे येतात. तेव्हा महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत असलेल्या रश्मिका मंदानाच्या मागे एक ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दिसते. त्या आहेत नीलकांती पाटेकर. 'छावा' सिनेमात नीलकांती पाटेकर या धाराऊची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे. अर्थात याविषयी अधिकृत खुलासा अजून झाला नाहीये.
नीलकांती पाटेकर यांच्याविषयी
नीलकांती पाटेकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'आत्मविश्वास', 'बर्नी' या मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय स्टार प्रवाहवरील 'गोठ' मालिकेत त्या दिसल्या होत्या. नीलकांती या लेखिका आणि दिग्दर्शिकाही आहेत. मराठी, हिंदी इंडस्ट्री गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या त्या पत्नी आहेत. संवेदनशील अभिनेत्री म्हणून नीलकांती यांची ओळख आहे. 'छावा' सिनेमात नीलकांती यांना पाहायला त्यांचे चाहते उत्सुक आहेत.