मराठी चित्रपटात झळकायचे : अमित साध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2017 11:24 AM
मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जात असल्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सध्या मराठी इंडस्ट्रीकडे आकर्षित होत आहेत. आता या यादीत अभिनेता अमित साध याचेही नाव जोडले गेले असून, त्याने मराठी चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुरू केली आहे.
सतीश डोंगरेमराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जात असल्याने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सध्या मराठी इंडस्ट्रीकडे आकर्षित होत आहेत. आता या यादीत अभिनेता अमित साध याचेही नाव जोडले गेले असून, त्याने मराठी चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याच्या आगामी ‘सरकार-३’निमित्त त्याच्याशी संवाद साधला असता, त्यानेच याबाबतचा खुलासा केला आहे. ‘सरकार-३’मध्ये अतिशय दमदार भूमिकेत असलेल्या अमितशी साधलेला हा संवाद...प्रश्न : ‘सरकार-३’मध्ये तू सुभाष नागरेच्या नातवाची भूमिका साकारत आहेस, अशात तुला मराठी भाषेचा अभ्यास करावा लागला काय?- मला सुरुवातीपासूनच मराठी भाषेचा आदर अन् आकर्षण आहे. सध्या मी मराठी शिकत आहे. जेव्हा ‘सरकार-३’मध्ये मी अमिताभ बच्चन यांच्या तोंडून काही मराठी डायलॉग ऐकले तेव्हा मी खूपच भारावून गेलो होतो अन् मीही काही डायलॉग बोलावेत अशी मी लगेचच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. परंतु स्क्रिप्टमध्ये माझ्या पात्रासाठी मराठी डायलॉग लिहिले गेले नसल्याने त्यांनी त्यास स्मित हास्य देऊन नकार दिला. परंतु त्याचबरोबर माझ्यातील मराठी भाषा शिकण्याच्या उत्सुकतेचे त्यांनी कौतुकही केले. मी दोन दिवसांपूर्वीच ‘तुझी आई कशी आहे?’ हे मराठी वाक्य शिकलो आहे. त्यामुळे मी अपेक्षा करतो की, भविष्यात मला एखाद्या तरी चित्रपटात मराठी डायलॉग बोलण्याची संधी मिळावी. प्रश्न : तुझे मराठीप्रतीचे आकर्षण पाहता, तू मराठी चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहेस काय?- होय, माझी मराठी चित्रपटसृष्टीकडे वाटचाल सुुरू आहे. मी एका मराठी शोवर काम करीत असून, त्यामध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्याचबरोबर मी एका मराठी वेबसीरिजमध्येही झळकणार आहे. सध्या मी मराठीत काम करण्यास उत्सुक असून, मराठी प्रेक्षकांना माझे काम आवडेल अशी मला अपेक्षा आहे. प्रश्न : करिअरच्या सुरुवातीच्या काळात तूला खूप स्ट्रगल करावे लागल्याचे तू वारंवार सांगत आला आहेस, याविषयी काय सांगशील?- होय, हे खरं आहे. मी बºयाचदा आॅडिशनसाठी जात होतो, परंतु काम मिळत नव्हते. अशावेळी मी खूप निराश होत होतो. परंतु मी हार मानली आहे. प्रत्येकवेळी नव्या उमेदिने मी कामाचा शोध घेत होतो. खरं तर इंडस्ट्रीत स्थिर होण्यासाठी प्रत्येक कलाकाराला स्ट्रगल करावाच लागतो. जेव्हा मला सलमान खानच्या ‘सुलतान’मध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मला काहीसा दिलासा मिळाला. आता ‘सरकार-३’मध्ये मी एका प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याने हा माझ्या करिअरला खूप मोठा ब्रेक असेल असे मी समजतो. प्रश्न : ‘सरकार-३’मधील तुझ्या भूमिकेसाठी खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी शिफारस केली होती, याविषयी काय सांगशील?- खरं आहे, अमिताभजींनी शिफारस केल्यामुळेच मला ही भूमिका मिळाली आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तसेच अमिताभजी यांचा मी आयुष्यभर ऋणी असेल. तसेच हा चित्रपट करताना मला माझ्या भूमिकेला पूर्णपणे न्याय द्यायचा होता. त्यामुळेच मी या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. अपेक्षा करतो की, चित्रपटातील माझे काम दिग्दर्शक, सहकलाकार आणि प्रेक्षकांना आवडेल. प्रश्न : या चित्रपटात यामी गौतमही तुझ्यासोबत एक वेगळ्या प्रकारची भूमिका साकारताना दिसत आहे, कसा अनुभव सांगशील?- यामीबद्दल बोलायचे झाल्यास ती एक दमदार अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेशीर राहिला आहे. माझ्या मते यामीची ही भूमिका तिच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वात वेगळी भूमिका असेल. चित्रपटात दाखविण्यात आलेली आमची लव्ह स्टोरी ही वेगळ्या प्रकारची असून, प्रेक्षकांना ती भावेल यात शंका नाही; मात्र याचे संपूर्ण श्रेय मी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना देऊ इच्छितो. कारण ते त्यांच्या पात्रांना प्रेक्षकांसमोर अशाप्रकारे सादर करतात की, प्रेक्षक ते बघण्यासाठी आतुर असतात. प्रश्न : तुझा ड्रीम रोल कोणता?- मी या विचाराने कधीच वाटचाल केली नाही. मिळालेली प्रत्येक भूमिका माझ्यासाठी ड्रीम रोलप्रमाणे आहे. चागलं काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हेच माझे ड्रीम राहिले आहे. भविष्यात मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. प्रत्येक भूमिकेत नावीन्यता निर्माण करण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेणार आहे. ‘सरकार-३’नंतर माझ्या करिअरला वेगळे वळण मिळेल याची मला खात्री आहे.