Join us  

 18 लाखांत तयार झालेल्या ‘नदिया के पार’ या सिनेमानं किती कमाई केली होती माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 2:50 PM

Sachin Pilgaonkar post : सचिन पिळगावकर यांनी शेअर केली पोस्ट, 39 वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारे आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर ( Sachin Pilgaonkar ) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. सचिन यांनी केवळ अभिनयच नव्हे तर लेखन,गायन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सर्वच क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला. बालकलाकार म्हणून फिल्मी करिअर सुरू करणाऱ्या सचिन यांनी हिंदीतही भरपूर भूमिका केल्या. गीत गाता चल, बालिका वधू, चितचोर, शोले, अखियों के झरोके से, सत्ते पे सत्ता अशा कितीतरी सिनेमांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण एक सिनेमा यापेक्षा सगळ्यांत वेगळा ठरला. आजही त्या चित्रपटाचं नाव घेतलं की, सर्वप्रथम सचिन यांचाच चेहरा डोळ्यांपुढे येतो. तो चित्रपट कोणता तर ‘नदिया के पार’ (Nadiya Ke Paar).

होय, गुंजा आणि चंदनच्या या प्रेमकहाणीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की खिळवून ठेवतो.

याच चित्रपटासंदर्भातील सचिन पिळगावकर यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 39 वर्षांपूर्वी केलेल्या ‘नदीया के पार’ या चित्रपटाच्या आठवणींना  उजाळा दिला आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित झाला, त्यावर किती खर्च आला आणि या चित्रपटानं किती कमाई केली, हे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘नदीया के पार’चं एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट पोस्टर शेअर करत त्यांनी या चित्रपटाची माहिती शेअर केली आहे.

‘1982 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमावर 18 लाख रूपयांचा खर्च झाला. दिल्लीत या चित्रपटाने अडीच कोटी रूपये कमावले.  पूर्वेकडच्या काही राज्यांमध्ये साडेतीन कोटी आणि देशातल्या इतर काही राज्यांमध्ये 4 कोटींचा व्यवसाय केला होता.  अलाहाबादमधील एका थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल 136 आठवडे सुरु होता.  वेगवेगळ्या ठिकाणी हा चित्रपट 100 आठवडे चालला, अशी माहिती सचिन यांनी शेअर केली आहे.सचिन यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी ‘नदीया के पार’  आणि यातील सचिन यांच्या अभिनयाचं कौतुक करत या चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल सचिन यांचे आभार मानले आहेत. 

टॅग्स :सचिन पिळगांवकरबॉलिवूड