वेळ - २ तास १० मिनिटेरेटिंग - २ स्टारकाव्या, एक गंभीर आजारी मुलगी, प्राध्यापक असलेल्या तिच्या वडिलांसोबत दार्जिलिंगला येते. तिच्या हातात थोडा वेळ शिल्लक असताना, ती कुलदीपला भेटते आणि त्याच्या प्रेमामुळे तिच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा आजवरचा सर्वांत सुंदर बनतो, इतके साधे या सिनेमाचे कथानक आहे. दिग्दर्शक सुवेंदू राज घोष यांचा ‘बिफोर यू डाय’ हा काव्याच्या (काव्या कश्यप) धैर्य आणि सामर्थ्याबद्दल आहे. तिला स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले आहे आणि तिच्या हातात फारसा वेळ शिल्लक नाही. या चित्रपटात तिच्या आयुष्यातील शेवटच्या सहा महिन्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे, जो ती दार्जिलिंगमध्ये घालवते. राजस्थानमधील तिच्या मूळ शहरापासून दूर तिच्यावर उपचार केले जात होते.
काव्याला तिच्या डॉक्टरांपासून दूर नेणारी पोस्टिंग घेण्याचे तिच्या वडिलांकडे कोणतेही ठोस कारण नाही. इथेच काव्याला कुलदीप (पुनीत राज शर्मा) भेटतो आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक आनंदी बदल होतात. ती त्याच्या प्रेमात पडते, परंतु तिला माहीत आहे की ते त्यांच्यासाठी चांगले होणार नाही. काव्या आजारी आहे हे प्रेक्षकांना कळवण्यासाठी चित्रपटाचा निम्मा रनटाइम (अंदाजे ९६ मिनिटे) वाया घालवला आहे. अतिशय वाईट संकलन आणि दिग्दर्शनाचा हा पुरावा आहे. बाकी चित्रपटात कुलदीप तिला मरण्यापूर्वी तिच्या काही इच्छा पूर्ण करण्यास कशी मदत करतो हे दाखवले आहे.
निर्मात्यांचा हेतू खरं तर एखाद्याने परिपूर्णपणे कसे जगले पाहिजे आणि आव्हानांना हसतमुखाने कसे सामोरे जावे हे दर्शविण्याचा होता, परंतु तरीही त्यांचे प्रयत्न कमी पडले. कथा अनेक ठिकाणी कमकुवत बनल्याने आणि पात्र हवेत लटकत राहिल्याने चित्रपट अतिशय संथ बनला आहे. सिनेमॅटोग्राफी आणि गाणी चांगली असली तरी, परफॉर्मन्सबद्दल बोलण्यासारखे काही नाही. सिनेमा खूप निराश करतो.