Marathi version of Pushpa' song Srivalli : एकीकडे ‘पुष्पा’ या साऊथच्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुडगूस घातला अन् दुसरीकडे सोशल मीडियावर या सिनेमाच्या ‘श्रीवल्ली’ या गाण्याचं मराठी व्हर्जन बनवणाऱ्या विदर्भातल्या मातीतल्या एका पोराने हवा केली. होय, विजय खंडारे ( Vijay Khandare )नावाचा हा पोरगा सध्या सोशल मीडियाचा ‘स्टार’ झाला आहे. त्यानं बनवलेलं गाणं व्हायरल झालं अन् हा पठ्ठ्या एका रात्रीत सेलिब्रिटी झाला. तेव्हापासून वाहिन्यांचे कॅमेरे त्याचा पाठलाग करत आहेत, जाईल तिथे सेल्फीसाठी त्याच्याभोवती लोक गराडा घालत आहेत. या अनपेक्षित यशानं तिवस्याचा विजय नुसता बुजून गेला आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निंभोरा बैलवाडी या छोट्याशा गावातला विजय खंडारे एका हातावर आणून पोट भरणाऱ्या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा. कधीकाळी रस्त्याच्या कडेला खारे शेंगदाणे विकणारा, लॉकडॉऊनच्या काळात हमाली करणारा हा मुलगा आज लोकप्रिय युट्युबर म्हणून ओळखला जातोय. गावरान ठसक्यातील कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय आहेत. पण त्यानं ‘श्रीवल्ली’ या गाण्याचं मराठी व्हर्जन बनवलं अन् तरूणाईनं त्याला डोक्यावर घेतलं. त्याचं हे गाणं तुफान व्हायरल झालं आणि 3 मिनिटं 44 सेकंदाच्या गाण्यानं विजयचं अख्खं आयुष्यचं बदललं. याच ‘वल्ली’ची ही प्रेरणादायी कथा...
बापानं गावात 20 एकर शेती करायला घेतली आणि त्यासाठी कर्ज काढलं. शेतीतून पिक येईल अन् चार पैसे गाठी पडतील, ही त्याची भाबडी आशा. पण निसर्ग कोपला अन् सगळ्या आशा संपल्या. 20 एकर शेतीतून तीन पोती सोयाबीन झालं पण तेही पावसानं खराब केलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला तो वेगळाच. अशात बापानं गावचं घर विकायला काढलं आणि खंडारे कुटुंबानं तिवसा या तालुक्याच्या ठिकाणी बिऱ्हाड थाटलं. एका भाड्याच्या घरात बाप, माय, बहीण आणि विजय राहू लागले. बाप हातगाडीवर छोटा धंदा करू लागला अन् विजय खारे शेंगदाणे विकू लागला. कशीबशी गुजराण सुरू झाली अन् पुन्हा नशिबाचे भोग सुरू झालेत. लॉकडाऊननं पुन्हा उपासमारीची वेळ आणली. हातगाडीवरचा बापाचा धंदा, शेंगदाण्याचा ठेला लॉकडाऊननं बंद पडला होता.
विजय सांगतो, लॉकडाऊनने आमचे लय वांदे केले. घरात राशन होतं, पण नुसत्या राशननं कसं जगायचं? मी निराश झालो होतो. मग पैसा कमावण्यासाठी चुलत भावासोबत 200 रूपये रोजानं हमाली करू लागलो. लॉकडाऊनमुळे हातात वेळ होता. म्हणून टिकटॉकवर व्हिडीओ बनवू लागलो. पण टिकटॉकही बंद पडलं. म्हणून मग मी युट्युब चॅनल बनवलं. पण बापाला ते काही पटेना. हे असले धंदे केल्यानं पोट भरणार नाही. काम कर नाही तर घर सोड, असं त्यांनी बजावलं. पण मला यातून काहीतरी बरं होणार, असं मला सारखं वाटत होतं. मी बापाला समजावत होतो आणि दोन महिन्यानंतर सहा हजाराचा पहिला चेक मिळाला. मी बाबाला दिला. पण सहा हजारात काय होणार होतं? मायबाप, बहीण होती, बायको होती. बाबा नाराज होते. पण मी हिंमत सोडली नव्हती. आज मला त्याचंच फळ मिळतंय. याच युट्यूब चॅनलच्या जोरावर 20 दिवसांपूर्वी गावातलं आमचं घरं पुन्हा परत विकत घेतलंय. आता बाबा खूश्श आहेत अन् मी सुद्धा...
"मले साऊथचा हिरो बनायचं आहे..."होय, ‘श्रीवल्ली’चं मराठी व्हर्जन बनवून सोशल मीडियाचा ‘हिरो’ झालेल्या विजय खंडारेला साऊथचा हिरो बनायचं आहे. लहानपणापासून त्यानं हे एकच स्वप्नं पाहिलं अन् आजही त्याच स्वप्नाचा पाठलाग तो करतोय.लहानपणापासून त्यानं हेच एक स्वप्नं पाहिलं. त्यासाठी अनेक प्रयत्न केलेत, आजही त्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तो तेलुगू शिकला. साऊथचाच हिरो का? असं विचारल्यावर तो सांगतो, ‘मॅडम, लहानपणापासून मित्र म्हणायचे तू साऊथच्या हिरोसारखा दिसतो. मी पण आरशात स्वत:ला पाहायचो तेव्हा मले बी तसंच वाटायचं. अॅक्टिंगमध्ये इंटरेस्ट होता, आजही आहे. त्यासाठी मी गेल्या तीन-चार वर्षापासून प्रयत्न करतोय. पण परिस्थितीमुळे आजपर्यंत यश मिळालं नाही़. तिथे जाऊन तीन-चार वर्ष राहायचं म्हटलं तर ते शक्य नव्हतं. पण मी अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीत. आज मी बऱ्यापैकी कमावतो. पण साऊथचा हिरो बनण्याचं स्वप्नं मी विसरलेलो नाही. मी हातपाय मारत राहणार, असं विजय म्हणाला.
तो अन् त्याची ‘श्रीवल्ली’
विजयच्या व्हिडीओत तो हिरो अन् त्याची बायको तृप्ती ही हिरोईन. तृप्ती व विजयचं प्रेमप्रकरण. एका लग्नात त्यानं पहिल्यांदा तृप्तीला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. तीच त्याची ‘श्रीवल्ली’. विजयच्या या रिअल लाईफ ‘श्रीवल्ली’ने विजयला प्रत्येक पावलावर साथ दिली. त्याच्या व्हिडिओची ‘हिरोईन’ बनण्याचंही तिनं मान्य केलं.
असं शूट झालं श्रीवल्ली गाणं...पुष्पाचं ‘श्रीवल्ली’ हे गाणं ऐकून विजयनं त्याचं मराठी व्हर्जन बनवण्याचं ठरवलं. आधी गाणं लिहिलं. ‘श्रीवल्ली’चा साऊंडट्रॅक आणि चाल वापरून बनवलेलं गाण्याची भट्टी चांगलीच जमली. पण ते शूट करायला पैसे नव्हते. मग त्याने मोबाईलवरचं ते शूट केलं. प्रोफेशनल नव्हतं पण तरीही हे गाणं महाराष्ट्रातील जनतेला ते आवडलं.