शहीद कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra)यांची आई कमलकांत बत्रा (Kamalkant Batra) यांचं काल निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे त्या कुटुंबासोबत राहत होत्या. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आज पालमपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कारगीर युद्धातील परमवीर चक्र विजेता शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर 'शेरशाह' हा सिनेमा आला होता. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने विक्रम बत्रा यांचं खरं कुटुंबही जगासमोर आलं. तेव्हा विक्रम बत्रा यांच्या आईवडिलांनी सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणीसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमध्ये ते आले होते. तेव्हा विक्रम बत्रा यांच्या आई कमलकांत बत्रा टीव्हीवरच लेकाच्या आठवणीत असं काही बोलल्या ज्याने प्रत्ये आईचं ऊर भरुन येईल. त्या म्हणाल्या होत्या, "जेव्हा त्याला गोळी लागली तेव्हा मी कोसळले होते. मला गर्व आहे की मी अशा मुलाला जन्म दिला आणि देशासाठी समर्पित केला."
इंडियन आयडॉलमध्ये गायक पवनदीपचं गाणं ऐकून सर्वच भावूक झाले होते. तेव्हा विक्रम बत्रा यांच्या आईवडिलांचाही भावूक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कमलकांत बत्रा यांच्या निधनानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही श्रद्धांजली वाहिली आहे.
शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांना 'शेरशाह' नावाने ओळखलं जातं. १९९९ साली कारगील युद्धावेळी त्यांनी दाखवलेल्या शौर्याची गाथा सर्वांनाच माहित आहे. या युद्धात त्यांनी देशासाठी प्राण दिले. त्यांच्या साहसी कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना सैन्यातील सर्वोच्च परमवीर पुरस्काराने सम्मानित केले.