बॉलिवूडची फॅशन डिझायनर आणि नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ताने ऑक्टोबर महिन्यात गोंडस लेकीला जन्म दिला. ११ ऑक्टोबरला मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं. आता लेकीच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी मसाबा आणि सत्यदीपने लाडक्या लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे.
मसाबाने सोशल मीडियावरून लेकीबरोबरचा एक फोटो शेअर करत तिच्या नावाचा उलगडा केला आहे. त्याबरोबरच लेकीच्या नावाचा अर्थही सांगितला आहे. मसाबा आणि सत्यदीपने त्यांच्या लेकीचं नाव 'मातारा' असं ठेवलं आहे. "मतारासह तीन महिने! हे नाव ९ हिंदू देवींच्या उर्जेचं प्रतीक आहे. शक्ती आणि ज्ञान यांना ते समर्पित आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मसाबा गुप्ताने २०२३ मध्ये अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. लग्नानंतर एका वर्षाने ते आईबाबा झाले आहेत. मसाबाचं हे दुसरं लग्न आहे. याआधी २०१५ मध्ये तिने मधु मंटेनाशी लग्नगाठ बांधली होती. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.