अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशहा म्हटले जाते. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार मानले जाते. त्याचसोबत त्यांनी छोट्या पडद्यावर देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांचा कुली हा चित्रपट प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या चित्रपचाच्या वेळी अमिताभ यांना एक मोठा अपघात झाला होता. या अपघातानंतर ते अनेक महिने रुग्णालयात होते. या चित्रपटाच्या वेळी झालेल्या अपघातानंतर काहीच महिन्यांनी त्यांनी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्या लहानपणाची भूमिका मास्टर रवीने साकारली होती.
बालकलाकार म्हणून काम केलेले अनेक कलाकार सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. त्याचप्रमाणे मास्टर रवी देखील गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.
मास्टर रवीने अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या लहानपणाची भूमिका साकारली आहे. अमर अकबर अँथोनीतील मास्टर रवी तर प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात आहे. रवीने अनेक चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या लहानपणाची भूमिका साकारल्यामुळे त्याची ही ओळखच बनली होती. मास्टर रवी गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
मास्टर रवीने मिस्टर नटवरलाल, गिरफ्तार, पाखंडी, शक्ती अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मंदिरा बेदीच्या शांती या मालिकेत देखील त्याने काम केले होते. मास्टर रवी लहानपणापासून अनेक चित्रपटांमध्ये काम करत असल्याने त्याला अभ्यासाठी वेळ मिळत नसे. पण नंतर त्याने आपल्या शिक्षणावर प्रचंड मेहनत घेतली. आज त्याने चांगले शिक्षण घेऊन तो एका उच्चपदावर पोहोचला आहे. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्याने मास्टर इन हॉस्पिटॅलिटी अँड इंटरनॅशनल बिझिनेस या विषयात एमबीए केले आहे. तो आज भारतातील प्रायव्हेट सेक्टरमधील टॉप बँकेमध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे काम करत आहे. एवढेच नव्हे तर तो लोकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग देतो. भविष्यात त्याला एखादी चांगली भूमिका मिळाली तर तो पुन्हा अभिनयक्षेत्राकडे वळेल असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.