साऊथचा सुपरस्टार रवि तेजाचा आगामी चित्रपट टाइगर नागेश्वर राव लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मास्टरमाइंड चोराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रवि तेजासोबत अभिनेत्री नुपूर सनॉन, अनुपम खेर आणि मुरली शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वामसीने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत...
>> तेजल गावडे.
टाइगर नागेश्वर राववर सिनेमा का करण्याचं ठरवलं?वामसीः कोणत्याही दिग्दर्शकाला बायोपिक सिनेमा बनवायला आवडेल. मीदेखील बऱ्याच मोठ्या कालावधीपासून बायोपिक बनवण्याचा विचार करत होतो. जेव्हा मी बायोपिकचा विचार करत होतो, तेव्हा माझ्या डोक्यात टाइगर नागेश्वर रावचे नाव आले. बऱ्याचदा दिग्दर्शक कलाकार, क्रिकेटर्स आणि राजकीय नेत्यांवरील बायोपिक बनवतात. मला हटके काहीतरी करायचे होते. सत्य घटना आणि खऱ्या व्यक्तीवर हा चित्रपट असल्यामुळे मी दोन वर्ष रिसर्च केला. त्या गावातल्या लोकांना भेटलो आणि त्याच्याबद्दल जाणून घेतले. दीड वर्षे प्री-प्रोडक्शन केले. त्यानंतर शूटिंग केले. जवळपास या पूर्ण प्रोसेसला पाच वर्षे लागली.
टाइगर नागेश्वर राव चित्रपटाबाबत किती उत्सुक आहात?रवि तेजाः मी प्रत्येक चित्रपटासाठी खूप उत्सुक असतो. पण या चित्रपटासाठी मी जास्त उत्सुक आहे. कारण आतापर्यंतच्या करिअरमध्ये अशा पद्धतीची भूमिका केली नव्हती. त्यामुळे हा चित्रपट आणि भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. जे खरे पात्र आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. त्यामुळे ही भूमिका करायला खूप मजा आली. या सगळ्याचे श्रेय आमच्या दिग्दर्शक वामसीला जातं.
नुपूर सनॉनः मी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. मी यासाठी स्वतःला खूप नशीबवान समजते. कारण पहिलाच चित्रपट आणि मी पाच भाषेतून पदार्पण करते आहे. माझ्या प्रेक्षकांची संख्यादेखील पाच पटीने वाढली आहे. माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे. ट्रेलरलाही प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळे मी या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे.
चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल सांगा?रवि तेजाः मी या चित्रपटात टाइगर नागेश्वर राव या मास्टरमाइंड चोराची भूमिका साकारली आहे. मला चित्रपटाची कथा आणि पात्र खूप भावले. या पात्राबद्दल मी आता जास्त सांगणार नाही. ते तुम्ही चित्रपटात पाहा. पण या व्यक्तीची एक खासियत आहे ती म्हणजे तो गुन्हे सांगून करतो.
नुपूर सनॉनः यात मी चित्रपटात साराची भूमिका साकारली आहे. टायगर तिच्या प्रेमात पडतो. खूप सुंदर लव्हस्टोरी आहे त्यांची. ती मारवाडी गर्ल आहे. दिग्दर्शकाला माहित होते की त्यांना या भूमिकेसाठी कशी मुलगी हवी आहे. जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा मी टिकली लावलेली होती. जीन्स आणि कुर्ता घातलेला होता. तेव्हा मला ते म्हणाले की, नुपूर मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मला सारा तुझ्यात दिसली. त्यांनी या भूमिकेला इतके छान पैलू दिले आहेत, की सगळ्यांना ही भूमिका आवडेल.
चित्रपटाचा अनुभव कसा होता?रवि तेजाः खूप चांगला अनुभव होता. सगळ्यांसोबत काम करायला मजा आली. माझा पूर्ण प्रोसेसवर विश्वास आहे आणि मला जेव्हा वाटतं हे काम करताना मजा येईल, तेव्हाच मी काम करण्यासाठी होकार देतो. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण प्रोसेस मी एन्जॉय केली.
नुपूर सनॉनः खूप चांगला अनुभव होता. साऊथ इंडस्ट्री खूप ऑर्गनाइज आहे. हे मी आतापर्यंत ऐकलं होतं. पण मी अनुभवलं देखील. प्रत्येक विभागातील लोक खूप बारकाईने प्रत्येक गोष्टीवर काम करतात. त्यामुळे काम करायला खूप मज्जा आली.
वामसीः खूप चांगला अनुभव होता. मी या चित्रपटाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाला प्रतिसाद देतात, हे पाहायचे आहे. रवि तेजाचा हा चित्रपट खूप वेगळा आहे. तुम्ही आतापर्यत त्याला अशा भूमिकेत पाहिलेलं नाही. तसेच हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपट आहे आणि यातून प्रेरणादेखील मिळते. त्यामुळे हा चित्रपट नक्की पाहा.