Join us  

माध्यम महत्त्वाचे नाही तर संधी महत्त्वाची -विक्रांत मेसी

By तेजल गावडे | Published: November 25, 2018 7:15 AM

अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची 'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देमी आज जे काही ते टेलिव्हिजनमुळे - विक्रांत मेसी'ब्रोकन' वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार प्रेमकथा

मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची  'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या निमित्ताने केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'ब्रोकन...बट ब्युटिफुल' या तुझ्या आगामी वेबसीरिजबद्दल सांग ?ब्रोकन वेबसीरिजमध्ये प्रेमकथा पाहायला मिळणार असून दोन व्यक्तींची कथा यात रेखाटण्यात आली आहे. या दोन व्यक्ती ज्या आपल्या जीवनात काहीना काही कारणामुळे विखुरलेले व निराश आहेत. पण, त्यांना भविष्यकाळ चांगले असेल, अशी आशा आहे.  त्या दोघांचीही पार्श्वभूमी व अनुभव वेगळे आहेत. मात्र त्यांच्यात एक साम्य आहे ते म्हणजे प्रेम. कारण माझे व लेखकांचे असे मानने आहे की प्रेम ही अशी गोष्ट आहे जी खूप साऱ्या गोष्टींना सोप्पी बनवते. यावर आधारीत ही वेबसीरिज आहे.

या वेबसीरिजमधील तुझ्या भूमिकेबद्दल व अनुभवाबद्दल सांग ?यात मी वीरची भूमिका साकारली असून तो २६-२७ वर्षांचा तरूण मुलगा आहे. तो बॅंकिंग सेक्टरमध्ये काम करतो. तो खूप महत्त्वकांक्षी आहे. तो १५ ते १६ तास काम करतो. तो वेळ देत नाही, ही त्याच्या पत्नीची तक्रार असते. त्याचे त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे. मात्र त्याला त्याचे भवितव्य सुरक्षित करायचे म्हणून तो जी-तोड मेहनत घेत असतो. मात्र त्याच्या जीवनात अशी एक गोष्ट घडते, ज्यामुळे एका रात्रीत त्याचे जीवन बदलून जाते. त्याचे प्राधान्य, विचार व भावना बदलून जातात. अचानक त्याच्या आयुष्यात समीरा (हरलीन सेठी) येते आणि त्याच्या आयुष्याला एक नवे वळण मिळते. या भूमिकेबाबत मी खूप उत्साही आहे. कारण यापूर्वी मी कधी अशी भूमिका केलेली नाही. हार्डकोअर लव्हस्टोरी असणारे काम कधी केलेले नव्हते आणि मला ते 'ब्रोकन'मुळे करायला मिळाले. खूप चांगला अनुभव होता. तसेच एकता कपूर यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली,यासाठी स्वतःला नशीबवान समजतो. मला आशा आहे की प्रेक्षकांना ही सीरिज नक्कीच भावेल.

या वेबसीरिजमध्ये तरूण पिढीला संदेश दिला आहे का ?जीवनात बरेच चढउतार येतील, पण कधी निराश होऊ नका, हे सांगण्याचा प्रयत्न या वेबसीरिजमधून केला आहे. जीवनात कधीही खचले नाही पाहिजे. जसे वेबसीरिजचे नाव आहे ब्रोकन बट ब्युटिफुल त्याप्रमाणे तुटलेली गोष्टदेखील सुंदर असू शकते. जीवनात नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. कोणत्याही चांगल्या व्यक्तीसोबत कधी वाईट होणार नाही. जीवनात आशा व उमेदच नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ उरत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न या कथेच्या माध्यमातून केला आहे. 

डिजिटल माध्यमाबद्दल तुला काय वाटते ?भारतात मनोरंजनासाठीचा हा खूप चांगला काळ आहे. डिजिटल हे एक नवीन माध्यम उपलब्ध झाले आहे. टेलिव्हिजनसारखे हे माध्यम असून हवे तेव्हा आपले मनोरंजन होऊ शकते. मोबाईल किंवा कम्प्यूटर असे कुठेही केव्हाही आपण आपल्याला हवे ते कार्यक्रम किंवा सीरिज वा सिनेमे पाहू शकतो. २०२४ सालापर्यंत संपूर्ण भारत डिजिटल होईल. भारतात जे कोणी कथा लिहितात किंवा चित्रपट वा मालिका बनवतात आणि कलाकार आहेत, त्यांची कला सादर करण्यासाठी हे खूप चांगले माध्यम आहे. 

चित्रपट, मालिका व वेबसीरिजमध्ये तू काम केलेस, तुझे आवडते माध्यम कोणते?मला तिन्ही माध्यम खूप आवडतात. माझ्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनपासून झाली. मी आज जे काही ते टेलिव्हिजनमुळे आहे. मालिकेत काम नसते केले तर मला सिनेमात काम मिळाले नसते आणि जर मी चित्रपटात काम केले नसते तर मला सीरिजमध्ये काम करायला मिळाले नसते. माझ्यासाठी माध्यम महत्त्वाचे नाही तर संधी महत्त्वाची आहे. चांगल्या कथेचा भाग व्हायला मिळणे महत्त्वाचे आहे. डिजिटल माध्यमातून मला एक्सप्लोर व्हायला मिळते आणि या माध्यमातून माझे काम जास्त लोकांपर्यंत पोहचते. मी जे काही करतो आहे, त्यातून मला आनंद मिळतो आहे. मला चांगल्या कथेचा भाग व्हायला मिळत आहे, याचा मला जास्त आनंद आहे. 

आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?'मिर्झापूर' वेबसीरिज नुकतीच दाखल झाली आहे. 'ब्रोकन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर क्रिमिनल जस्टिस या आणखीन एका वेबसीरिजमध्ये मी काम केले आहे. 'यार जिगरी', 'कार्गो' व 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' हे माझे आगामी चित्रपट आहेत. या वर्षातील माझा अखेरचा चित्रपट आहे 'पिंड दान'. या सिनेमाच्या निमित्ताने सीमा भार्गव पाहवा व दृश्यम फिल्म्ससोबत पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली.