दिसायला देखणा आणि माचोमॅन धर्मेन्द्र (Dharmendra ) नावाचा तरूण बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायला आला खरा. पण इथे प्रवेश मिळवणं आणि टिकून राहणं सोप्प नव्हतं. अशावेळी एक आधाराचा हात त्याच्या दिशेने पुढे आला. तरण्या, देखण्या धरमला आधार देणारा हा हात होता मीना कुमारीचा (Meena Kumari). होय, कवीमनाची, हळवी आणि रिअल लाईफमध्ये तेवढीच एकाकी मीना कुमारी धर्मेन्द्र यांच्याकडे कधी आकर्षित झाली, हे तिलादेखील कळलं नाही. आज मीना कुमारी आपल्यात नाहीत. पण तिच्या या अधुऱ्या आणि अनोख्या प्रेमकहाणीची चर्चा आजही होते.
धर्मेन्द्र यांनी फिल्मफेअरचं टॅलेंट कॉम्पिटिशन जिंकलं होतं. पण सिनेमे मिळत नव्हते. परिस्थिती अशी की, गॅरेजमध्ये राहावं लागतं होतं. हळूहळू धर्मेन्द्र यांना साइड हिरोच्या भूमिका मिळू लागल्या होत्या. पण मोठा ब्रेक मिळत नव्हता. काही लोकांचा तर धर्मेन्द्र हे हिरो बनू शकतात, यावरच विश्वास नव्हता. राजकुमार यांनी तर अनेकदा धर्मेन्द्र यांची खिल्ली उडवली होती. ‘हा पंबाजी मुलगा हिरोसारखा नाही तर फुटबॉलच्या खेळाडूसारखा दिसतो,’ असं राजकुमार बेधडक बोलायचे. अशा स्ट्रगल काळात धर्मेन्द्र यांच्या आयुष्यात मीना कुमारी आली.
‘काजल’ या सिनेमात मीना कुमारी होती. राजकुमार तिचा हिरो होता आणि धर्मेन्द्र यांनी या चित्रपटात तिच्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या सेटवर धर्मेन्द्र यांच्याकडे मीना कुमारीचं फारसं लक्ष गेलं नाही. पण ‘फूल और पत्थर’च्या शूटींगदरम्यान पंजाबचा हा गबरू जवान अचानक मीना कुमारीच्या डोळ्यांत भरला. तिची आणि धर्मेन्द्रची मैत्री वाढली. इतकी की, त्यांची ही मैत्री कमाल अमरोही यांनाही खटकू लागली होती. खरं तर पती कमाल अमरोहीसोबतचं मीना कुमारीचं नातं संपल्यात जमा होतं. पण तरिही कमाल अमरोहींना धर्मेन्द्र व मीना कुमारीची जवळीक सहन होईना. ‘पाकिजा’साठी मीना कुमारीचा नायक म्हणून धर्मेन्द्र यांचा विचार चालला होता. पण कमाल अमरोहींना धर्मेन्द्र नकोच होते. त्यांनी धर्मेन्द्र यांना डच्चू देऊन ‘पाकिजा’साठी राजकुमारची निवड केली आणि एका अजरामर चित्रपटाचा भाग बनण्याची संधी धर्मेन्द्र यांच्या हातातून कायमची गेली.
धर्मेन्द्र गावातून आले होते आणि मीना कुमारी तेव्हाची सुपरस्टार होती. तिनेच धर्मेन्द्र यांना बॉलिवूडमध्ये राहण्या-बोलण्याचे नियम शिकवले. त्यांना सिनेमे मिळवून दिले. तोपर्यंत ती धर्मेन्द्रच्या प्रेमात अक्षरश: वेडी झाली होती. मीना कुमारीची मदत आणि नशीबाची साथ यामुळे धर्मेन्द्र हळूहळू इंडस्ट्रीत स्थिरावले. बºयापैकी नाव कमावलं. पण यशाच्या पायऱ्या चढता चढता मीना कुमारीतील त्यांचा इंटरेस्ट कमी कमी होत गेला. मीना कुमारीसाठी मात्र धर्मेन्द्र यांना विसरणं शक्य नव्हतं. असं म्हणतात की, यानंतर तिने स्वत:ला पूर्णपणे दारूच्या हवाली केलं. पुढे या व्यसनानंच मीना कुमारीचा घात केला.
असंही म्हटलं जातं की, धर्मेद्र यांच्यावर मीना कुमारी वेड्यासारखं प्रेम करायला लागली होती. पण ती इतकी पझेसिव्ह झाली होती की, धर्मेन्द्र यांना तिला सहन करणं कठीण झालं होतं. एकदा तर धर्मेन्द्र यांनी मीना कुमारीला थप्पडही मारली होती. यात किती तथ्य आहे हे तर ठाऊक नाही. पण आजही धर्मेन्द्र व मीना कुमारी यांची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये ऐकवली जाते. या प्रेमकहाणीला शेवटपर्यंत ना नाव मिळालं, ना ओळख. पण या प्रेमाची चर्चा आजही होते.