मिनाक्षी शेषाद्रीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. त्याकाळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिनाक्षीची गणना केली जात असे. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण मीनाक्षीने लग्न केल्यानंतर चित्रपटांमध्ये काम न करता तिच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.
मिनाक्षीचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. ते परदेशात स्थायिक आहेत. त्याचमुळे मिनाक्षी गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातच राहाते. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे.
मिनाक्षी चित्रपटसृष्टीत असताना तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. अभिनेता अनिल कपूर सोबत तिचे अफेअर असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण त्या दोघांनीही यावर मौन राखणेच पसंत केले होते. मिनाक्षी आणि गायक कुमार सानू यांच्या अफेअरची तर त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. जब कोई बात बिगड जाये हे मिनाक्षी शेषाद्रीवर चित्रीत करण्यात आलेले गाणे कुमार सानूने गायले असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. याच कुमार सानू आणि मिनाक्षीचे अनेक वर्षं अफेअर होते. कुमार सानूची पहिली पत्नी रिटाने त्यांच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीला जबाबदार धरले होते. १९९४ ला प्रकाशित झालेल्या फिल्मफेअर मासिकानुसार कुमारची पत्नी रिटाने घटस्फोटाची केस दाखल करताना मिनाक्षी त्यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे घटस्फोटाच्या कारणामध्ये लिहिले होते. फिल्मफेअरमध्ये ही बातमी आल्यानंतर या बातमीची चांगलीच चर्चा झाली होती. पण मिनाक्षीने यावर मौन राखणेच पसंत केले होते.
घटस्फोटाबद्दल रिटाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मी गरोदर असताना कुमार सगळे पैसे मिनाक्षीवर उघळत होता. त्यावेळी माझ्याकडे एक रुपयादेखील नसायचा. मिनाक्षी आणि कुमार यांच्याविषयी सुरुवातीला मला कळल्यावर मिनाक्षीसारखी सुसंस्कृत मुलगी असे करू शकेल यावर माझा विश्वासच बनला नव्हता. पण नंतर मला सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या.