पाकिस्तानी अभिनेत्री मीरा खान सध्या जाम संतापली आहे. याला कारण आहे, मीराचा ‘सिमरन’ हा चित्रपट आणि भारताचा न मिळालेला व्हिसा. ‘सिमरन’ बनून तयार आहे. पण भारताचा व्हिसा मिळत नसल्याने मीराचा हा चित्रपट अडकून पडला आहे. होय, भारत-पाकिस्तान या उभय देशांच्या संबंधांमुळे मीराचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर प्रदर्शित होऊ शकलेला नाही. हेच मीराच्या संतापाचे कारण आहे आणि यासाठी भारत-पाक वादापेक्षा तिने पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला अधिक जबाबदार ठरवले आहे. माहिरा खानने भारताविरोधात एक वादग्रस्त विधान केले होते. तिच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला होता. ‘ पाकिस्तानने भारतापासून प्रभावित होण्याची काहीही गरज नाही. आपण बॉलिवूड नाही,’असे माहिरा खान म्हणाली होती. (विशेष म्हणजे, यानंतर काही वर्षांत माहिरा बॉलिवूड चित्रपटात दिसली. ज्या बॉलिवूडला माहिरा खानने हिणवले होते, त्याच बॉलिवूडमध्ये तिने काम केले. ‘रईस’ या चित्रपटात तिने शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर केली.) ‘रईस’च्या प्रदर्शनाच्यावेळी माहिराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण माहिराचा हाच व्हिडिओ मीरासाठी अडचणीचा ठरतोय.मी जेव्हाही व्हिसासाठी भारतीय दूतावासात जाते, मला माहिरा खानच्या त्या विधानाची आठवण करून देत माघारी पाठवले जाते, असेही मीराने म्हटले आहे. मीराचे मानाल तर, माहिरा शाहरूखच्या अपोझिट कास्ट करावे या लायकीचीच नव्हती. बॉलिवूडमधून काम करून परतताच ती भारताविरोधात बरळू लागली. मी सुद्धा भारतात काम केले. पण दोन्ही देशांच्या संबंधांवर कधीच बोलले नाही. शाहरूखने ‘रईस’च्या रिलीजदरम्यान माहिराला मीडियासोबत बोलण्याची पद्धत शिकवली असती तर ती अशी बरळली नसती. माहिराने भारताविरोधातील वक्तव्यासाठी माफी मागायला हवी, असेही मीराने म्हटले आहे.तुम्हाला ठाऊक असेलच की, मीराने ‘नजर’ आणि ‘कसक’ या बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे.