अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सर्वप्रथम अभिनेत्री कंगना राणौतने नेपोटिजमचा मुद्दा उपस्थित केला होता. सुशांतने आत्महत्या केली नाही तर तो नेपोटिजमचा बळी ठरला, असा जाहीर आरोप कंगनाने केला होता. याआधीही अनेकदा कंगना नेपोटिजमवर बोलली आहे. करण जोहरला ‘मुव्ही माफिया’ म्हणत तिने बॉलिवूडच्या अनेक स्टारकिड्सवर तोंडसुख घेतले आहे. पण आता नेपोटिजमविरोधात गळा काढणा-या याच कंगनावरच राजकारण केल्याचा आरोप होत आहे. ही आरोप करणारी कोण तर साऊथ अभिनेत्री मीरा मिथून.
मीराने कंगनावर परखड टीका केली आहे. ‘राजकारण’ केल्याशिवाय तुला ‘थलाइवी’ सिनेमा कसा मिळाला? असा सवाल तिने केला आहे. ‘घराणेशाहीचा खरा अन्याय तुझ्यावर (कंगना) नाही तर माझ्यावर झाला आहे. कंगना तुझ्यात अशी कुठली प्रतिभा आहे की, आमच्या तामिळनाडूच्या महान मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका तुला मिळावी? कॉलिवूडमधील राजकारणामुळेच तुझ्या पदरात ही भूमिका पडली. लाज वाटते की, तुझ्यासारखी अभिनेत्री जयललितांसारख्या महान, सुशिक्षित आणि जिगरबाज महिलेची भूमिका करतेय. ज्या भूमिकेत तू अजिबात फिट बसत नाही,’ असे मीराने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.