बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांसोबतच पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत असतो. यात खासकरुन त्याची लव्हलाइफ जास्त चर्चिली जाते. वयाची ५० पार करणाऱ्या सलमानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. यात संगिता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबत असलेल्या अफेअरची तर तुफान चर्चा रंगली. परंतु, सध्या सोशल मीडियावर सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडची चर्चा होताना दिसते. संगिता बिजलानी सलमानची पहिली गर्लफ्रेंड नसून अन्य एक अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे.
सलमानच्या गर्लफ्रेंडचा विषय निघाला की साधारणपणे सोमी अली, संगिता बिजलानी किंवा ऐश्वर्या राय यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मात्र, या अभिनेत्रींव्यतिरिक्त सलमान आणखी एका अभिनेत्रीला डेट करत होता. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचा कियारा आडवाणी आणि दिवंगत अभिनेता दिलीप कुमार यांच्याशी जवळचा संबंध असल्याचं सांगण्यात येतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान लोकप्रिय अभिनेत्री शाहीन बानू (Shaheen Banu) हिला डेट करत होता. शाहीन ही सलमानची पहिली गर्लफ्रेंड होती. सलमान आणि शाहीन यांच्यात इतकी जवळीकता होती की, 'मैंने प्यार किया' या चित्रपटाचं ऑडिशनही त्यांनी एकत्र दिलं होतं. मात्र, शाहीनऐवजी भाग्यश्रीला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं.
मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना सलमान आणि शाहीनची पहिली भेट झाली होती. त्यावेळी शाहीन बानू, शाहीन जाफरी या नावाने ओळखली जायची. अभिनेत्री कियारा आडवाणीच्या आईने जेनेवीव आडवाणीने सलमान आणि शाहीनची भेट घडवून आणली होती. परंतु, हे नातं फार काळ टिकलं नाही. काही काळातच सलमान-शाहीन वेगळे झाले.
'मैंने प्यार किया'चं चित्रीकरण सुरु असताना सलमानची भेट संगीता बिजलानीसोबत झाली. या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं व ते एकमेकांना डेट करु लागले. त्यामुळेच शाहीनने सलमान-संगीताच्या मार्गातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि तिने सलमानसोबत ब्रेकअप केलं.
दरम्यान, शाहीन, ही दिवंगत अभिनेता दिलीप कुमार यांची भाची असून कियारा आडवाणीची आई तिची चुलत बहीण आहे. त्यामुळे शाहीन ही कियाराची मावशी लागते. शाहीनने अभिनेता सुमीत सहगलसोबत लग्न केलं. त्यांना सायशा ही मुलगी असून ती देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सायशा दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अभिनेता आर्यासोबत लग्न केलं आहे.