बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. ती लवकरच बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे. या लग्नसोहळ्याला काही जवळची मंडळी उपस्थित राहणार आहेत. दियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी रहना है तेरे दिल में मधील तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक भावते. दीयाच्या अभिनयापेक्षा त्याच्या सौंदर्याची अधिक चर्चा रंगते. दिया वैभव रेखीसोबत लग्न करणार ही बातमी मीडियात आल्यापासून तिचे फॅन्स वैभव कोण आहे हे गुगलवर शोधत आहेत. दीयाच्या हृदयावर राज्य करणारा वैभव रेखी कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दीया मिर्झा १५ फेब्रुवारीला वैभव रेखीसोबत सात फेरे घेणार आहे. यात तिचे काही खास फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर उपस्थित राहणार आहेत.
दीयाचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर दोघे ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये सोशल मीडियावर विभक्त होत असल्याचे सांगितले होते. दीया मिर्झा आणि साहिल संघा या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की, आम्ही वेगळे होत आहोत पण आमच्यात मैत्रीचे नाते नेहमीच राहील. आम्ही कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही नेहमी चांगले फ्रेंड्स राहणार आहोत आणि नेहमी एकमेकांचा आदर करणार आहोत.
दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीया मिर्झाने रहना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.