Join us

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वीच केले लग्न, मीडियापासून लपवून ठेवली होती ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 1:07 PM

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या प्रियकरासोबत दोन वर्षांपूर्वी अतिशय साधेपणाने लग्न केले. तिने ही गोष्ट मीडियापासून लपवून ठेवली होती.

ठळक मुद्देमेघनाने 25 डिसेंबर 2016 मध्ये पोर्तुगिजमधील टेनिस खेळाडू लुईस माईगुईल रेईस सोबत लग्न केले. लुईस आणि तिचे अफेअर जवळजवळ सहा वर्षं सुरू होते. सहा वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मेघना नायडूने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला खरी लोकप्रियता ही कलियों का चमन या आयटम साँगमुळे मिळाली. या गाण्यातील तिच्या नृत्याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. मेघना 2016 मध्ये क्या कूल है हम 3 या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ती प्रसारमाध्यमांपासून गायब आहे. मेघना काय करतेय, कुठे आहे हे तिच्या चाहत्यांना माहीतच नाहीये. पण तिने गेल्या दोन वर्षांपूर्वी लग्न केले असून ती सगळा वेळ तिच्या कुटुंबियांना देत आहे.

मेघनाने 25 डिसेंबर 2016 मध्ये पोर्तुगिजमधील टेनिस खेळाडू लुईस माईगुईल रेईस सोबत लग्न केले. लुईस आणि तिचे अफेअर जवळजवळ सहा वर्षं सुरू होते. सहा वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने ही गोष्ट गेल्या कित्येक वर्षांपासून मीडियापासून लपवून ठेवली होती. याविषयी तिने नुकतेच सांगितले आहे. तिने प्रसारमाध्यांशी बोलताना सांगितले आहे की, मी आणि लुईस आमच्या आयुष्यात खूपच खूश आहोत. आमच्या लग्नाविषयी मीडियाला माहीत नसल्याने आमच्याकडे सतत कोणाचे लक्ष नसते आणि हीच गोष्ट आम्हाला खूप आवडत आहे. आमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातलगांना सगळ्यांनाच आमच्या लग्नाबद्दल माहीत आहे. मला स्वतःला लग्न धुमधडाक्यात करायला आवडत नाही. आयुष्यातील खास लक्ष हे केवळ आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबतच साजरे केले पाहिजे असे मला वाटते. माझे लग्न साधेपणाने व्हावे असे स्वप्न मी अनेक वर्षांपूर्वीच पाहिले होते. त्या प्रमाणेच मी लग्न केले. मी नुकतेच लुईसला विचारले की, मला आपल्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगायचे आहे. तुला चालले का? त्यावर सगळ्यांना सांगायला माझी काहीही हरकत नाही असे त्याने मला सांगितले. 

मेघनाने लग्न करण्याचा निर्णय केवळ एका दिवसांत घेतला. तिला शॉपिंग करायला देखील वेळ मिळाला नव्हता. तिने तिच्या आईच्या वाढदिवसाला लग्न केले होते. याविषयी ती सांगते, मी माझ्या आईला विचारले होते की, तुला वाढदिवसाचे गिफ्ट काय हवे आहे तर यावर तुम्ही लग्न करा असे माझ्या आईने सांगितले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला शॉपिंग करायला किंवा मेहेंदी काढायला देखील वेळ मिळाला नव्हता. आम्ही अयप्पा मंदिरात गेलो आणि आम्ही हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. आम्ही आता पुढील वर्षी चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले आहे. 

मेघना आणि लुईस एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. याविषयी मेघना सांगते, आम्ही 21 वर्षांपूर्वी टेनिस कोर्टवर भेटलो होतो. माझे वडील टेनिसचे कोच होते. त्यांनीच माझी आणि लुईसची ओळख करून दिली होती. आम्ही त्यानंतर काही वर्षं नात्यात होतो. पण त्याच्यात आणि माझ्यात दहा वर्षांचे अंतर आहे. त्यावेळी मी खूपच लहान असल्याने बहुधा त्याने त्यावेळी आमच्या नात्याबद्दल तितका गांभीर्याने विचार केला नव्हता. त्यानंतर काही वर्षं आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. आठ वर्षांपूर्वी सोशल मीडियामुळे आम्ही पुन्हा एकमेकांशी बोलायला लागलो आणि पुन्हा आमच्या नात्याला नव्याने सुरुवात झाली. मी आणि लुईस नात्यात आहे हे कळल्यावर माझे आई-वडील खूपच खूश झाले होते. लुईस तुझ्यासाठी अगदी योग्य आहे अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. 

लुईसची मुंबई, पार्तुगाल आणि दुबई मध्ये टेनिस अॅकेडमी असल्याने तो आणि मेघना सतत वेगवेगळ्या शहरात फिरत असतात. मेघना मुंबईत खूपच कमी वेळ राहात असल्याने तिला बॉलिवूडमध्ये काम करण्यास वेळ नाहीये. तसेच मेघना देखील टेनिस खेळाडू असल्याने ती स्वतः देखील त्याच्या कामात जातीने लक्ष देते.

टॅग्स :बॉलिवूड