मेरा नाम जोकर या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटात सर्कसमधील जीवन आपल्याला पाहायला मिळाले होते. या चित्रपटात एका जोकरच्या भूमिकेत आपल्याला नत्थू दादा यांना पाहायला मिळाले होते.
नत्थू दादा यांचे आज निधन झाले असून ते 70 वर्षांचे होते. त्यांनी केवळ मेरा नाम जोकर या चित्रपटामध्येच नव्हे तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी राज कपूर, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे. त्यांनी त्यांच्या 20 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कालावधीत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. नत्थू दादा राजनांदगाव जिल्ह्यातील रामपूर गावात राहात होते. त्यांनी मेरा नाम जोकर या चित्रपटाद्वारेच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी शेवटच्या क्षणी त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांच्या गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नत्थू दादा यांना दारा सिंह यांच्यामुळे बॉलिवूडमध्ये येण्याची संधी मिळाली होती. भिलाईमध्ये एका फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेसाठी दारा सिंह आले होते. त्यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या नत्थू दादांना त्यांनी उचलले होते. त्याचवेळी दारा सिंह आणि नत्थू दादा यांची भेट झाली आणि त्यांनीच नत्थू दादा यांना राज कपूर यांना भेटवले होते. राज कपूर यांनी त्यांना पाहाताच त्यांना मेरा नाम जोकरमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यांच्या बुटक्या उंचीमुळे त्यांना अनेक चित्रपटात भूमिका मिळत असत.