बॉलिवूडमध्ये महिलांवर झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात ‘मी टू’ मोहिमेने जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक महिलांनी स्वत:वर झालेल्या लैंगिक शोषणाविरूद्ध आवाज उठवला आहे. आता या यादीत एक नवे नाव सामील झाले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे, अमायरा दस्तूर. ‘मी टू’अंतर्गत अमायराने आपले कटू अनुभव शेअर केले आहेत.एका ताज्या मुलाखतीत अमायरा यावर बोलली. मी पुरूष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरले आहे. पण त्यांची नावे जगजाहिर करून त्यांना जगासमोर उघडं करण्याची हिंमत माझ्यात नाही. ते इंडस्ट्रीतील शक्तीशाली माणसं आहेत. मी कास्टिंग काऊचला बळी पडले नाही. पण याशिवाय बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री दोन्ही ठिकाणी मी अत्याचार सहन केला. एक दिवस मी नक्कीच याचा खुलासा करेल. पण जोपर्यंत मी स्वत:ला सुरक्षित समजत नाही, तोपर्यंत मी कुणाकडेही बोट दाखवणार नाही, असे अमायरा म्हणाली.अमायराने २०१३ मध्ये इश्क या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. अनेक तामिळ चित्रपटातही तिने काम केले आहे.तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहिम वणव्यासारखी पसरत आहे. या मोहिमेअंर्तगत विकास बहल, कैलाश खेर, रजत कपूर, अभिजीत भट्टाचार्य, आलोक नाथ अशा अनेकांवर महिलांनी गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.