‘मीटू’ मोहिम जोरात फोफावत असताना लैंगिक शोषणाचे आरोप झेलणाऱ्या अनेकांविरूद्ध कठोर भूमिका घेण्याची हिंमत बॉलिवूडने दाखवली आहे. या आरोपांमुळे अनेकांना प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आले आहे. यातलेच एक नाव म्हणजे, कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदना. अभिनेत्री कृतिका शर्मा आणि अन्य एका महिलेने विक्कीवर लैंगिक गैरतर्वनाचे आरोप केल्यानंतर अलिकडे ‘राधा क्यों गोरी, मैं क्यों काला’च्या मेकर्सनी विक्कीला बाहेरचा रस्ता दाखवला. आता आणखी एका चित्रपटातून विक्कीला बाहेर काढण्यात आल्याचे कळतेय. होय, जॉन अब्राहम, निखिल अडवाणी आणि भूषण कुमार यांनी ‘बटला हाऊस’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या क्रेडिट लाईनमधून विक्कीला दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की हा ‘बटला हाऊस’चा कास्टिंग डायरेक्टर होता. विक्कीवरचे आरोप आणि त्याच्याविरोधात सुरू असलेली चौकशी बघता, ‘बटला हाऊस’च्या क्रेडिट लाईनमधून विक्कीचे नाव गाळण्यात येणार आहे. विक्कीचे ‘बटला हाऊस’चे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याला चित्रपटातून काढणे शक्य नाही. पण ‘बटला हाऊस’ क्रेडिट लाईनमध्ये त्याचे नाव नसेल.
निखील अडवाणी दिग्दर्शित ‘बटला हाऊस’ हा चित्रपट निखील अडवाणी, भूषण कुमार आणि स्वत: जॉन असे तिघे मिळून प्रोड्यूस करत आहेत. १९ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीच्या जामिया नगरात इंडियन मुजाहिदीनच्या संदिग्ध अतिरेक्यांविरोधात मोहिम उघडण्यात आली होती. यात आतिफ अमीन व मोहम्मद साजिद या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. दोन अन्य अतिरेकी पळण्यात यशस्वी झाले होते. तर एकाला जिवंत अटक करण्यात आली होती. ही चकमक बटला हाऊस एन्काऊंटर म्हणून ओळखली जाते. जॉनच्या चित्रपटाची कथा याच चकमकीवर आधारित असेल. निखीलने या चित्रपटासाठी सर्वांत आधी सैफ अली खानशी संपर्क साधला होता. सैफला चित्रपटाची स्क्रिप्टही आवडली होती. पण काही कारणास्तव सैफने त्यास नकार दिला आणि हा चित्रपट जॉनच्या झोळीत पडला.