हिंदी चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच आणि लैंगिक शोषणाचे आरोप कायम होत असतात. संधी मिळावी यासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती.
यांत अभिनेत्री राधिका शर्मा, स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कोंकणासेन शर्मा यांचा समावेश आहे. याच यादीत आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. या अभिनेत्रीचं नाव तनुश्री दत्ता असून तिने घेतलेले नाव अनेकांसाठी धक्कादायक आहे. सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असलेल्या तनुश्रीने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे. २००८ हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक गौप्यस्फोट तिने केला आहे.
या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरियोग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात दाखवण्याचा अट्टाहास नाना करत होते अशी आठवण तिने सांगितली आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने ही आपबीती सांगितली आहे. कॉन्ट्रॅक्टनुसार ते गाणं सोलो होतं मात्र नाना पाटेकरांना आपल्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता असा गंभीर आरोपही तिने केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे ते गाणं न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. हा प्रकार आठवला की आजही दचकते असंही तिने म्हटले आहे. या सगळ्या प्रकारानंतर चित्रपटसृष्टीच्या दुतोंडी वृत्तीवरही तिने तोंडसुख घेतले आहे.
माझ्यासोबतच नाही तर अन्य काही अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करुनही नाना चित्रपटसृष्टीत काम करत असल्याबद्दल तिने संताप व्यक्त केला आहे. कुणीही घाबरुन नाना विरोधात बोलत नसल्याचंही तिने म्हटले आहे. २००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा सिनेमातही झळकली. मात्र २०१० नंतर ती सिनेमांत दिसली नाही. त्यामुळे तिचे हे आरोप खरे की निव्वळ पब्लिसिटी स्टंट किंवा काम मिळवण्याचा प्रयत्न तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. तसंच या सगळ्या आरोपांना नाना कसं उत्तर देतात हेही पाहावं लागेल.