मीटू मोहिमेमुळे बॉलिवूडमधली भांडणे चव्हाट्यावर आली आहेत. लोक याचा आनंद घेत आहेत हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे. सुभाष घई, नाना पाटेकर, साजिद खान यांची नावे मीटू प्रकरणात पुढे आली. लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप काहींनी या तिघांवर केले आहेत. यांच्याशिवाय इतरही काही महिलांनी इतर कलाकारांवरही आरोप केले आहेत. हे सगळे दुर्दैवी असल्याचे जॅकी श्रॉफने म्हटले आहे.
एका शॉर्ट फिल्मच्या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ बोलत होते. त्यावेळी त्यांना मीटू मोहिमेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, एकमेकांची उणीधुणी चव्हाट्यावर आणली जात आहेत आणि लोक तमाशा पाहात आहेत ही बाब चांगली नाही. काम करण्याच्या जागी महिलांचे शोषण होणे ही बाब चांगली नाही, त्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. जर असे काही प्रकरण समोर आले तर त्याविरोधात कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे. लैंगिक शोषण होत असेल तर ते सहन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपल्याला महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करावे लागेल.