#MeToo: निहारिका सिंगने नवाजुद्दीन सिद्दीकीवर लैंगिक शोषणाचा केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 05:41 PM2018-11-10T17:41:00+5:302018-11-10T17:41:37+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकीवर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप माजी मिस इंडिया अर्थ व अभिनेत्री निहारिका सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाची बरीचशी प्रकरणे समोर आली. यात दिग्गज कलाकारांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यात आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप माजी मिस इंडिया अर्थ व अभिनेत्री निहारिका सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. निहारिका नवाजुद्दीन सिद्दीकीची एक्स गर्लफ्रेंड आहे. निहारिकाने नवाजुद्दीनसोबत निर्माते भूषण कुमार यांच्यावर देखील आरोप केले आहेत.
पत्रकार संध्या मेनन यांनी निहारिका सिंगची आपबीती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात निहारिकाने सांगितले आहे की, एक दिवस सकाळी जेव्हा मी घरी होते तेव्हा नवाज रात्रभर चित्रीकरण करून आला होता. तो माझ्या घराजवळच राहत होता. मी त्याला नाश्ता करण्यासाठी घरी बोलवले. मी दरवाजा खोलला तर नवाजने मला घट्ट पकडले. मी त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ झटापट केल्यानंतर मी त्याच्या तावडीतून सुटले. मला या नात्याचे काय करावे, हे समजत नव्हते. नवाजने मला सांगितले की, माझे स्वप्न आहे की परेश रावल व मनोज वाजपेयी यांच्यासारखी माझी पत्नीदेखील मिस इंडिया किंवा अभिनेत्री असली पाहिजे. काही कालावधीनंतर मला समजले की नवाजचे बऱ्याच मुलींसोबत अफेयर आहे आणि सगळ्यांना वेगवेगळी कहाणी ऐकवतो. एकानंतर एक सत्य बाहेर आल्यानंतर मी त्याच्यासोबतचे नाते संपवून टाकले होते.
निहारिकाने भूषण कुमार यांच्यावर देखील आरोप केला असून त्याबद्दल तिने सांगितले की, भूषण कुमारने मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवले आणि त्यांचा अ न्यू लव स्टोरीसाठी साईन केले. त्यांनी मला एक लिफाफा दिला. ज्यात दोन पाचशेंच्या नोटा होत्या. त्यानंतर रात्री त्यांनी मला मॅसेज केला की मला तुझ्याबद्दल बरेच काही जाणून घ्यायचे आहे. तर आपण एकत्र काही क्षण व्यतित करू शकतो का? उत्तरात मी का नाही, डबल डेटवर जाऊयात. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन या आणि मी माझ्या बॉयफ्रेंडला आणते. त्यावर मला भूषण कुमारचा कोणताही रिप्लाय आला नाही.
निहारिकाच्या आरोपावर अद्याप नवाजुद्दीन सिद्दीकीने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.