संपूर्ण देशात शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. यादरम्यान मिर्झापूर फेम अभिनेता दिव्येंदु शर्माचा आगामी चित्रपटदेखील शेतकऱ्यांच्या वाईट स्थितीवर भाष्य करतो. या चित्रपटाचे नाव आहे मेरे देश की धरती. या चित्रपटावर मागील वर्षापासून दिव्येंदु काम करत होता मात्र लॉकडाउनमुळे चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्याात आले होते. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'कार्निवल मोशन पिक्चर्स'चा ‘मेरे देश की धरती’ हा हिंदी चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. २३ डिसेंबरला ‘शेतकरी दिना’च्या निमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती, फराझ यांचं दिग्दर्शन आणि विक्रम यांनी संगीत दिग्दर्शित केलेला 'मेरे देश की धरती' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे.
‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची असून कथा नील चक्रवर्ती यांची आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांनी केले आहे. प्रोडक्शन डिझायनर संजॉय दासगुप्ता तर वेशभूषा सुचिता गुलेचा आहेत. लोव पाठक कार्यकारी निर्माता आहेत.