Pankaj Tripathi daughter Aashi Tripathi : आज बॉलिवूडमध्येपंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi ) या नावाचा मोठा दबदबा आहे. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंकज यांनी बराच संघर्ष केला. 2004 मध्ये ‘रन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. पण त्यांची ही भूमिका इतकी छोटी होती की, त्याच्याकडे कुणाचंच फारस लक्ष गेले नाही. मात्र पंकज यांनी हार न पत्करता, मिळेल त्या भूमिका स्वीकारत आपला प्रवास सुरु ठेवला. अखेर 2012 मध्ये ‘गँग ऑफ वासेपूर’ मिळाला आणि पंकज त्रिपाठी यांना खरी ओळख मिळाली.अल्पावधीतच त्यांनी अभिनयानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पंकज फार क्वचित आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलतात. पण ‘कालिन भैय्या’च्या प्रेमात असलेले चाहते, कायम त्यांच्या व त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. आता ‘कालिन भैय्या’च्या लेकीचे फोटो समोर आले आहेत आणि सर्वजण तिचे फोटो पाहून तिच्या प्रेमात पडले आहे. पंकज त्रिपाठीच्या लेकीपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील, इतकी ती सुंदर आहे.
पंकज त्रिपाठी यांनी अलीकडे आपल्या इन्स्टा अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत. हे फोटो नुकत्याच पार पडलेल्या आयफा अवार्ड सोहळ्यातील आहेत. या फोटोत पंकज आपल्या कुटुंबासोबत दिसत आहेत. पत्नी मृदुला व लेक आशी त्रिपाठी (Aashi Tripathi ) या फोटोत दिसत आहेत. आशी त्रिपाठीची झलक पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत.फोटोत आशी रॉयल ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेस. सिंपल लुकमधील तिच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पंकज त्रिपाठी यांनी 2004 मध्ये मृदुलासोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनीही बराच संघर्ष केला. अगदी लग्नानंतर पंकज यांच्यासोबत बॉईज होस्टेलमध्ये मृदुलाला राहावं लागलं. संघर्षाच्या काळात मृदुला पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
सुलभ शौचालयापासून सुरू झाली होती ‘कालीन भैय्याची’ची लव्हस्टोरी
सुलभ शौचालय बनवण्याऱ्या एका मिस्त्रीमुळे ‘कालीन भैय्याची’ची लव्हस्टोरी सुरु झाली आणि त्याच्यामुळेच लग्नापर्यंत पोहोचली. होय, या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती ती सुलभ शौचालयापासून. कशी तर गोष्ट आहे 1992 सालची. त्यावर्षी मृदुला (पंकज यांची पत्नी) हिच्या गावात सुलभ शौचालय उभारले जात होते. या सुलभ शौचालयाचे इस्टिमेट घेण्यासाठी पंकज यांच्या गावचा मिस्त्री गेला होता. त्याचे नाव होते मुख्तार. तो इस्टिमेट देऊन परत आला आणि परतल्यावर गप्पात गप्पात त्या गावात एक हरिणीसारखी मुलगी बघितल्याचे त्याने पंकज यांना सांगितले. झाले, या हरिणीसारख्या मुलीला कधी एकदा पाहतो, असे पंकज यांना झाले. त्यांना तशी संधी लवकरच मिळाली.
योगायोगाने मृदूलाच्या गावातच पंकज यांच्या बहिणीचे लग्न जमले. तिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पंकज त्या गावात गेले. एकीकडे बहिणीचा साखरपुडा सुरु होता आणि दुसरीकडे पंकज यांचे डोळे त्या हरिणीसारख्या मुलीला शोधत होते. अचानक ती दिसली. पण हरिणीसारखी आली आणि तेवढ्याच चपळपणे दिसेनासी झाली. यानंतर बहिणीच्या लग्नात मात्र ती हरिणी पंकज यांना दिसलीच. होय, ती तिच्या बाल्कनीत उभी होती. तिला पाहताच लग्न करेल तर हिच्याशीच हे पंकज यांनी ठरवून टाकले. ती कोण, कुठली, तिचे नाव काय, यापैकी पंकज यांना काहीही ठाऊक नव्हते. पण पहिल्याच नजरेत ते तिच्यावर भाळले होते. ती तीच होती, हरिणीसारखी मुलगी. तिचे नाव मृदुला.