ठळक मुद्देसुभाष घई यांनी ‘कांची’ या चित्रपटातून मिष्ठीला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’मध्ये मिष्ठीची एक महत्त्वपूर्ण भूमिका होती.
कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीजनंतर वादात सापडला आहे. होय, या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर अन्य कलाकारांचे सीन्स कापल्याचा आरोप केला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने असाच आरोप केला आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, मिष्ठी चक्रवर्ती. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’तील तिच्या रोलला कात्री लावण्यात आली आणि मिष्ठी भडकली. कंगनावर तिने तिची सगळी भडास काढली.
आधी ही मिष्ठी कोण, हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. सुभाष घई यांनी ‘कांची’ या चित्रपटातून मिष्ठीला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’मध्ये मिष्ठीची एक महत्त्वपूर्ण भूमिका होती. पण चित्रपट रिलीज झाला आणि मिष्ठी चाट पडली. कारण चित्रपटातील तिचे सगळे फाईट सीन्स गायब होते. अलीकडे स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत मिष्ठी यावर बोलली.‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’त मी काय करतेय, मी कुठे आहे? असा संतप्त सवाल तिने यावेळी केला. माझा प्रत्येक सीन एडिट केला गेला. मी कमल जैन यांना सुरुवातीला या चित्रपटासाठी नकार दिला होता. पण तुझा रोल मोठा आहे. महत्त्वपूर्ण आहे, असे वचन त्यांनी मला दिले आणि मी या चित्रपटासाठी राजी झाले. क्रिश हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, म्हणूनही मी होकार दिला. कारण मी त्यांचे काम पाहिले होते. यानंतर मी अनेक सुंदर सीन्स शूट केलेत. क्रिश यांनीच माझे सीन्स शूट केलेत. पण मणिकर्णिका रिलीज झाल्यावर मी तो बघितला आणि मला धक्का बसला. कारण माझे फाईट सीन्स अख्ख्या चित्रपटात कुठेही नव्हते. सरतेशेवटी कंगना हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे, हे मला ठाऊक असते तर मी हा चित्रपट कधीही केला नसता, असे मिष्ठी म्हणाली.
तिने अभिनेता सोनू सूदलाही पाठींबा दिला. कंगना व सोनू सूद वादात कंगनाने वूमन कार्ड खेळले. मी महिला दिग्दर्शिकेसोबत काम करणार नाही, असे सोनूने कधीच म्हटले नव्हते, असे ती म्हणाली.