देसी गर्ल प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) 2000 साली लंडनमध्ये 'मिस वर्ल्ड' (Miss World) किताब पटकावला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज तिने टॅलेंटच्या जोरावर हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. 'बर्फी',' डॉन', 'फॅशन', 'मेरी कोम' सारखे एकापेक्षा एक चित्रपट तिने दिले. नुकतंच मिस वर्ल्ड 2024 चं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना यंदाची मिस वर्ल्ड ठरली. यानिमित्त प्रियंका चोप्राचाही मिस वर्ल्डदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. प्रश्न उत्तर सेशनमध्ये प्रियंकाने दिलेलं उत्तर खरंतर चुकीचं होतं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोणता होता तो प्रश्न?
मिस वर्ल्ड पेजेंट 2000 वेळी प्रियंका चोप्राने दिलेलं उत्तर सध्या व्हायरल होतंय. शेवटच्या प्रश्न उत्तर सेशनमध्ये प्रियंकाला 'आजच्या काळातील सर्वात यशस्वी महिला कोण आणि का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रियंकाने मदर टेरेसाचं नाव घेतलं. प्रियंका म्हणाली, 'अशा अनेक महिला आहेत ज्या आदर्श आहेत पण माझ्या सर्वात आवडत्या मदर टेरेसा आहेत. त्या खूप दयाळू, विचारशील आणि प्रेमळ आहेत. त्यांनी आपल्यासाठी आणि इतरही अनेक देशांसाठी खूप काही मिळवलं. इतरांचं जीवन सुंदर बनवण्याठी त्यांनी स्वत:जवळ असलेल्या गोष्टींचा त्याग केला. यावरुन आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. प्रियंकाने दिलेलं हे उत्तर चुकीचं होतं तरी ती मिस वर्ल्ड झाली अशा प्रतिक्रिया येत आहेत.
प्रियंकाचं उत्तर चूक का?
प्रियंकाच्या उत्तरावर तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या खऱ्या पण ते उत्तर तसं पाहायला गेलं तर चुकीचं होतं. कारण ही गोष्ट २००० सालची आहे तेव्हा मदर टेरेसा हयात नव्हत्या. त्यांचं निधन 1997 सालीच झालं होतं. 2022 मध्ये प्रियंका चोप्राची प्रतिस्पर्धक, मिस बारबाडोस २००० आणि युट्यूबर लीलानी मॅककोनीने दावा केला होता की प्रियंकाला जिंकवण्यात गडबड झाली आहे. प्रियंका चोप्रा आणि तेव्हाच्या चॅनल्सवर तिने पक्षपात आणि विजेती कोण होईल हे आधीच ठरलं होतं असे आरोप केले. तिने आपल्या युट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये यावर चर्चा केली होती.